लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहे. मात्र यातील काही निर्णयामुळे गरीब जनतेसह विद्यार्थीही भरडले जात आहेत. विद्यार्थ्यांकडून पहिले गणवेश खरेदीची पावती घ्या, नंतरच पैसे द्या, अशा जी.आर. परिपत्रकामुळे शाळा सुरू होवून १६ दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक गावातील विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत येत आहेत.पारदर्शक कारभार हे ब्रिद घेवून राज्य सरकार सध्या काम करीत आहे. पारदर्शी कारभारामुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल, असा सरकारने अनेकदा दावा केला आहे. हा दावा खराही असेल. मात्र या कारभाराचा फटका जिल्हा परिषद अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या लाभार्थ्यासह जिल्हा परिषद व महानगरपालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे.शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. परंतु जि.प. च्या शाळेत शिक्षणासाठी येणारे जवळजवळ सर्वच विद्यार्थी गरीब असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकाकडे गणवेशाचे पैसे असतेच असे नाही. त्यामुळे अनेक पालक गणवेश खरेदी करीत नाहीत. परिणामी खरेदीची पावती त्यांना मिळत नाही आणि गणवेशाचे अनुदानही मिळत नाही. या शासनाच्या नव्या धोरणामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचितगणवेशाची रक्कम मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांनी परिश्रम घेत विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडले. परंतु जेमतेम परिस्थिती असलेले पालक अद्याप गणवेश खरेदी करू शकले नाही. त्यामुळे या पारदर्शी कारभाराला या गरिबांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जि.प. व मनपा शाळेतील हजारो विद्यार्थी गणवेशाविनाच आहेत.अगोदर गणवेश खरेदी करा; नंतर पैसे घ्याशासनाच्या परिपत्रकामुळे गणवेशाची रक्कम मुख्याध्यापकाकडून खात्यात आली तरी विद्यार्थ्यांना ती लगेच दिली जात नाही. पालकांनी प्रथम स्वत:च्या पैशाने गणवेश खरेदी करून त्याची पावती मुख्याध्यापकांना दाखविणे अनिवार्य आहे. तेव्हाच ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वळती करण्यात येणार आहे.
विद्यार्थी गणवेशाविनाच
By admin | Updated: July 14, 2017 00:14 IST