कोरपना तालुक्यातील सिमेंट कारखान्यात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात कामगार संघटना काम करत आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून झालेली वेतनवाढ कामगारांना न मिळाल्यामुळे सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात कामगारांनी आंदोलनाला सुरुवात केली. याविषयी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले. याचदरम्यान खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी कारखान्याला भेटी दिल्या. त्यामुळे कामगारांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही फलश्रुती काहीच न दिसल्यामुळे शेवटी कंत्राटी कामगारांनी आपल्यामधूनच प्रतिनिधीची नेमणूक करून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना साकडे घातले. कामगारांचे हित लक्षात घेता ना. वडेट्टीवार यांनी आवाळपूर अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रशासनाला खडसावले व पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलन कुणाचेही असो, मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, अशी अपेक्षा कामगार व्यक्त करीत आहेत.
कामगारांच्या स्थायी नोकरीसाठी संघटनांचा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST