कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी : नदी पात्रात उभे राहून आंदोलन चंद्रपूर: विजेच्या खांबामुळे विद्युत शॉक लागून मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इरई नदीच्या पात्रामध्ये उभे राहून बुधवारी धरणे आंदोलन केले. २२ एप्रिल २०१६ रोजी रमेश पांडुरंग जाधव (२३) या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. सदर घटनेला सात महिन्यांचा कालावधी लोटूनही या युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली नाही. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदन सादर करण्यात आली. मात्र नुकसानभरपाई देण्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. मृत रमेश जाधव याचे वडील ७० वर्षांचे असून डोळ्यांनी अंध आहेत. एक बहिण विधवा असून दोन मुले आहेत. यांचा सांभाळ कसा करायाचा असा प्रश्न जाधव यांच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे जाधव कुटुंबीयांना १५ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच मनपा प्रशासन तथा सबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटेनच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यापूर्वी प्रहार संघटनेच्या वतीने अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना तिनदा निवेदन दिले. आर्थिक मदत न दिल्यास उपोषण करण्याचा इशाराही दिला. मात्र कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे प्रहारतर्फे आंदोलन केले. यावेळी अध्यक्ष पप्पू देशमुख, फिरोज खान पठाण, अभय येरगुडे, राहुल दडमल, हर्षल सैरम, घनश्याम येरगुडे, इमदाद शेख, वैभव लेडांगे, सतिष खोब्रागडे, पाझारे व जाधव आदी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)
प्रहारचे इरई नदीवर धरणे आंदोलन
By admin | Updated: December 22, 2016 01:40 IST