चंद्रपूर
छपरे उडाली : घरावर झाड कोसळून तीन गंभीर जखमी : रविवारी रात्री जिल्ह्यात विविध भागात विजांच्या कडकडाटासह वादळाने थैमान घातले. यामुळे अनेक घरांवरील छपरे उडून गेलीत. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. बल्लारपूर तालुक्यातील बामणी (काटवली) येथे जुने चिंचेचे झाड घरावर कोसळून त्यात अंगणात झोपून असलेले एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले. यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. कोठारी
जवळ असलेल्या बामणी (काटवली) येथे आनंदराव मडावी आपल्या कुटुंबासह घराच्या अंगणात झोपले होते. रविवारी रात्री अचानक वादळ आले. त्या वादळात घरासमोर असलेले जुने चिंचेचे झाड मुळासकट उन्मळून घरावर कोसळले. त्यात आंनदराव मडावी (५५), गीता आनंदराव मडावी (२२), व मल्लेश कुळमेथे (३२), गंभीर जखमी झाले. आनंदराव यांची मुलगी गीता हिची प्रकृती चिंताजनक आहे. ती चंद्रपुरच्या जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यूशी झुंज देत आहे. घटनेनंतर गावकर्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथे रवाना केले. दरम्यान, जि.प. सदस्य चंद्रकांत गुरु यांनी घटनास्थळाला भेट देवून आकस्मिक संकटात सापडलेल्या जखमींना शासकीय मदत देण्याची मागणी बल्लारपूरचे तहसीलदार बी. डी. टेळे यांच्याकडे केली. घटनेचा पंचनामा तलाठी कन्नाके यांनी केला. काटवलीचे सरपंच माधुरी राजू ढुमणे, उपसरपंच गिरीधर आत्राम, ग्रा.पं. सदस्य सुनील भगत यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली. रविवारी
रात्री अचानक आलेल्या वादळाने घुग्घुस परिसरातील अनेक गावांना धडक दिली. त्यामुळे नागरिकांच्या घरावरील छपरे उडून गेली. काहींच्या घरातील धान्य पाण्यात भिजले. रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली. ११ के.व्ही.ची वीज वहन करणारे खांब कोसळले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. परिसरातील घुग्घूस, उसगाव आणि म्हातारदेवी या गावांमध्ये वादळाने मोठे नुकसान केले. झाडे उन्मळून पडल्याने काही काळ घुग्घुस-उसगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. म्हातारदेवी या गावातील अनेक घरांवरील छपरे उडून गेली. त्यात बेबी गंगाधर शेदू ही महिला किरकोळ जखमी झाली. टिना अडाल यांच्या घरातील टिव्हीचे नुकसान झाले. त्यांच्या डोळ्यालाही दुखापत झाल्याने त्या जखमी झाल्या. (लोकमत चमू)