भद्रावती : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेधार्थ भद्रावती तालुका भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नागपूर-चंद्रपूर मार्गावर भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड राजू गैणवार यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी १२ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सुमारे अर्धा ताप रास्ता अडवून धरल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.१६ फेब्रुवारीला कॅम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते समाजवादी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी कॉ.उमा पानसरे यांच्यावर कोल्हापुरात अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून गंभीर जखमी केले. त्यात २० फेब्रुवारीला मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान कॉ. गोविंद पानसरे यांचे निधन झाले. त्यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर हे अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही. खूनाची जबाबदारी घेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, तसेच हल्लेखोरांसोबत त्यांच्या मागे असलेल्या सुत्रधारांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी रस्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात कामगार नेते डी. एच. उपासे, जिल्हा कार्यकारी सदस्य मारोतराव रामटेके, गैणवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेविका सीमा पवार, मुकेश पतरंगे, दिलीप वनकर, मनोहर ताजणे, सागर भेले, ए. के. कॅप्टन, एम.यू. पाल, वनकर, इटनकर, छाया मोहितकर आदी सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)
गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भद्रावतीत रास्ता रोको
By admin | Updated: March 3, 2015 00:59 IST