तहसीलदारांना निवेदन : अखिल प्राथमिक शिक्षक संघाची मागणीभद्रावती : दिवसेंदिवस शिक्षकांवर अशैक्षणिक कामे देऊन कामाचा बोझा वाढवत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याचे काम रद्द करण्यात यावे, यासाठी अखिल भद्रावती प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याचे कामे करण्याविषयी प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु शासन परिपत्रक क्र.आरटीई २०१३ प्र.क्र. १३२१ प्रशिक्षण मंत्रालय विस्तार भवन मुंबई २०१३ आरटीई अॅक्ट २००९ मधील प्रकरण चारमधील कलम (२७) शासन निर्णय क्रमांक १३ जून २०१० नुसार निवडणूक वगळता इतर कोणत्याही प्रयोजनार्थ राज्य शासन, स्थानिक स्वराज्यसंस्था अथवा खासगी संस्थेद्वारे प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना सेवेत वापरण्यात येवू नये असे स्पष्ट नमूद केले आहे. तसेच शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे रद्द करण्याचे आदेश दिले आहे. शिक्षकांच्या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या कालावधी दरम्यान शालेयस्तरावर संकलित मुल्यमापन क्र. १ (प्रथम सत्रपरिक्षा) तसेच नवचेतना मिशन अंतर्गत गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी घडविण्याचे आव्हान शिक्षकांच्या पुढे आहे. परंतु शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाच्या व्यापामुळे शिक्षकांचे विद्यार्थी घडविण्याचे मिशन अयशस्वी होताना दिसत आहे. त्यासाठी शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नये या मागणीसाठी अखिल भद्रावती प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार राजू पढाले यांनी निवेदन स्वीकारले. (शहर प्रतिनिधी)
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणे बंद करा
By admin | Updated: October 29, 2015 01:34 IST