लखमापूर : कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडावरुन काळ्या दगडाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुप्त माहिती गडचांदूर पोलिसांना मिळताच सोमवारी दुपारी ३ वाजता एका ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अरुण कर्रे असे वाहन चालकाचे नाव असून तो हिंगोली जिल्ह्यातील नागनाथ येथील रहिवासी आहे. या पहाडावरील खनिज संपत्तीच्या उत्खननावर शासनाची बंदी आहे. अकोला येथील एका तस्कराच्यामार्फत काहीे स्थानिकांना सोबत घेऊन काळ्या दगडाची तस्करी केली जात आहे. काळा दगड तळोधी जि. अकोला येथील जीर्ण मंदिराच्या बांधकामाकरीता नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती आहे. पकडण्यात आलेल्या वाहन चालकाकडे वाहतूक करण्याचा परवाना नसल्याची माहिती आहे. तरी सुध्दा वाहन माणिकगड पहाडावर गेले कसे? याबाबतही शंका कुशंका वर्तविली जात आहे. त्याचबरोबर या वाहनामालकास राजुरा तहसील विभागामार्फत या आधी परवाना देण्यात आला होता. परंतु, परवान्या कालबाह्य झाल्यानंतरही वाहतुक सुरूच आहे. एम.एच. ३० एल- १९०० क्रमांकाच्या वाहनाने तस्करी करण्याचा प्रयत्न सुरू होता. वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार गडचांदूर येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारात माल नेण्यात येत असल्याचे सांगितले. यावरुन स्थानिकाचीच तस्करांची हात मिळवणी असल्याची स्पष्ठ होत आहे. माणिकगड पहाडालगतच्या शंकर देव मंदिर व विष्णू मंदिराच्या जीर्ण उद्धारासाठी छुप्या मार्गाने अशाप्रकारची तस्करी करण्यात आल्याचेही समजते.तस्करी माणिकगड पहाडावरुन सुरू असताना वनविभागाचे दुर्लक्ष का, असाही प्रश्न नागरिक करीत आहे. प्रकरणाचा तपास जिवती पोलीस ठाण्याकडे असून अद्याप आरोपींवर गुन्हे दाखल केले नसून वाहन चालक अरुण करे यांची चौकशी सुरू आहे. (वार्ताहर)
माणिकगड पहाडावरुन दगडाची तस्करी
By admin | Updated: September 29, 2014 23:03 IST