सर्व शाळांत स्थापन होणार समित्या : सीईओंंनी दिले आदेशचंद्रपूर : शालेय स्तरावर बालिकांवर होणाऱ्या अत्यचाराच्या घटना थांबविण्यासाठी आणि त्यावर वेळीच पायबंद घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने राज्यात पहिले पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी या संदर्भात समिती स्थापन करण्याचे सर्व शाळांना आदेश दिले असून खासगी शाळांमध्येही हा उपक्रम राबविला जाणार आहे.जिल्ह्यातील सर्व खासगी आणि जिल्हा परिषदांच्या शाळांना मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी पत्र लिहिले असून बालिका अत्याचार प्रतिबंधक कमिटी (गर्ल्स चाईल्ड अँटी हरॅशमेन्ट कमिटी) स्थापन करून त्याचा अहवाल कळविण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्वरूपाची समिती सर्व शाळा स्तरावर गठित करण्यात पुढाकार घेणारी चंद्रपूर जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या एक हजार ५८६ आणि खाजगी सुमारे एक हजार शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये ही योजना राबविण्याचा मानस असून शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.शालेय स्तरावर विद्यार्थीनींसोबत दुर्व्यवहार होत असल्यास हा प्रकार सांगण्यास त्या घाबरतात. तक्रार करूनही बरेचदा योग्य दखल घेतली जात नाही. यामुळे त्यांच्या मनात सतत दहशत असते. त्याचा परिणाम शिक्षणावर होतो. त्यामुळे या समस्येच्या निराकरणासाठी ही समिती असल्याचे सिंग यांनी सांगितले. या समितीच्या अध्यक्ष शाळेच्या मुध्याध्यापिका किंवा ज्येष्ठ शिक्षिका असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळेत शिक्षिका नसेल तर ग्रामपंचायत कमेटीच्या महिला सदस्य या समितीच्या अध्यक्ष असतील. सदस्य म्हणून शाळेतील अन्य शिक्षिका, ग्रामपंचायत महिला सदस्य, पोलीस पाटील तसेच वरच्या वर्गातील विद्यार्थिनी यात सदस्य असतील. (जिल्हा प्रतिनिधी)
बालिका अत्याचार प्रतिबंधासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे पाऊल
By admin | Updated: August 7, 2016 00:34 IST