सावली : सावली पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांचा डोंगर निर्माण झाला होता. त्याची झळ प्राथमिक शिक्षकांना आर्थिक तथा मानसिक स्वरुपात पोहचत होती. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पुरोगामी शिक्षक समितीने २३ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले. बेमुदत उपोषणाच्या पहिल्याच दिवशी संवर्ग विकास अधिकारी पवार व गटशिक्षणाधिकारी कुमरे यांनी संघटना पदाधिकाऱ्यांशी दोन तास चर्चा केली. परंतु संघटना पदाधिकाऱ्याचे समाधान न झाल्यामुळे बेमुदत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अखेर मंगळवारी शिक्षण सभापतींनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.सुनील वैद्य व विजय भोगेकर हे दोघे उपोषणाला बसले होते. उपोषण मंडपास सुमारे २०० शिक्षकांनी भेट दिली. आंदोलनाची तिव्रता लक्षात घेता सभापती चंदा लेनगुरे यांनी मंडपास भेट देऊन तासभर चर्चा केली. तीन वर्षापेक्षा अधिक काळ उलटलेल्या बिलाला पुढील मासिक सभेत मंजुरी प्रदान करण्याचे आश्वासन दिले व उपोषण मागे घेण्याची सूचना केली. सभापतीनी दिलेल्या आश्वासनामुळे सुमारे २०० शिक्षकांची एक वेतनवाढीची थकबाकी (हिंदी, मराठी सूट) व एकस्तर वेतनवाढीची थकबाकी मिळण्याचा मार्ग सुकर झाला. आर.डी.चा प्रश्न ऐरणीवर होता. आर.डी.ची रक्कम नगदी स्वरुपात वाटप केली. ८ दिवसात संपुर्ण ५२ शिक्षकांचे आर.डी. बुक पैशासह परत करण्याचे ठरले. जी.पी.एफ. चा पाचवा हप्ता २०३ शिक्षकांना पाठविला. पगारातून कपात केलेले हप्ते पुढील महिन्यापासून विहीत मुदतीत न पाठविल्यास व्याजाचा भुर्दंड संबंधित कर्मचारी देतील, असे संवर्ग विकास अधिकारी पवार यांनी सांगितले. विज्ञान प्रदर्शनाची रक्कम देयकाची दुसरी कॉपी प्राप्त होताच देण्यात येईल किंवा ज्यांनी उचल केली असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठरले. १५ दिवसांच्या आत सर्व प्राप्त देयकानुसार एल.टी.सी. देण्याचे मान्य केले. जवळपास २ लाख रुपयांचे देयके मंजूर करून बँकेला पाठविल्याची पावती संघटनेकडे दिली व उपोषण मागे घेण्याबाबत गट शिक्षणाधिकारी कुमरे यांनी विनंती केली. त्यानंतर उपोषणकर्त्यानी उपोषण सोडले. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षक समितीच्या आंदोलनाची सांगता
By admin | Updated: April 2, 2015 01:30 IST