प्रलंबित मागण्या : जिल्हाभरात एल्गारचंद्रपूर : कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवाकाळ तत्काळ नियमित करावा या मागणीसह काही महिन्यापूर्वी राज्यातील ग्रामसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उपासले होते. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन आंदोलकांना शांत केले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे ग्रामसेवकांनी पुन्हा सोमवारपासून धरणे देऊन असहकार आंदोलन सुरू केले आहे.गोंडपिंपरी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. पंचायत समितीच्या आवारासमोर संपूर्ण ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी एकत्र आले. धरणे व असहकार आंदोलन सुरू केले. ग्रामसेवकाच्या १५ मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्यांची शासनाने पूर्तता करावी व ग्रामसेवकांना न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोमवारच्या पंचायत समिती स्तरावरील आंदोलनानंतर ११ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन, १५ नोव्हेंबरला नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन, त्यानंतर १७ नोव्हेंबरला काम बंद आंदोलन व चाब्या प्रशासनाकडे सुपूर्द करणे आदी आंदोलनात चर्चा करण्यात आली. आंदोलनात तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आशिष सुखदेवे, प्रमोद भोयर, माधुरी लोखंडे, रसिका करडभुजे, दिलीप घडले, रामदास तेलकुमरे, हरिनाथ गुरनुले, उषा टेभुर्णे, हर्षवर्धन खोब्रागडे, ललिता काळे यांच्यासह अनेक ग्रामसेवक उपस्थित होते.बल्लारपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनात उडी घेतली असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प केला आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या समस्या व विविध कामे बंद झाली असून ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लात आहे. या आदोलनात सहभागी झालेले ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी बल्लारपूर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करीत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना बल्लारपूर शाखेचे अध्यक्ष एल.एन.वाघाडे, सचिव बी.एन. केवे, एल.वाय. पोवरे, ए.बी. पानसरे, गुरुदास देवगडे, गणेश कोकोडे, महेश मिलमिले, राजेश भानोसे, वी.वी. मानकर, प्रतापराव ढुमणे व शुभांगी रामटेके यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ग्रामसेवकाचे असहकार आंदोलन प्रारंभ
By admin | Updated: November 8, 2016 01:00 IST