नागभिड येथे दोन मंडपात उपोषण: रुग्ण उपचारापासून वंचितनागभीड : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शुद्धीकरणासाठी दोन उपोषण मंडप थाटण्यात आले आहे. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय विभाग या उपोषणाची काय दखल घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नागभीड येथे ३० खाटांचे रुग्णालय आहे. डॉ. गणेश पणेकर वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. पणेकर यांच्या कार्यकाळात नागभीड, तळोधी, चिचपल्ली, ब्रह्मपुरी आणि भिवापूर येथील बनावट बील जोडून लाखो रुपयांची उचल करण्यात आली असा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. एवढेच नाही तर, नसबंदी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना जेवण दिले नसतानाही ७५ हजार ८१६ रुपयाचे बिल जोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व वैद्यकीय अधीक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्ते सुरेश कोल्हे यांनी केली आहे.रुग्ण कल्याण समितीचे सदस्य भास्कर शिंदे यांनीही विविध मागण्यांसाठी ग्रामीण रुग्णालय परिसरात उपोषण सुरू केले आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ असूनही नवजात शिशु केंद्र कार्यान्वित नाही. शिशू केंद्र येथे कार्यान्वीत व्हावे, ग्रामीण रुग्णालय नागभीड येथील बनावट बील प्रकरणाची एचआरएचएम जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून चौकशी करण्यात यावी, मागील १० वर्षांपासून येथील क्ष-किरण मशीन बंद आहे. त्यामुळे ही मशीन निर्लेखित करण्यात आली आहे. या ठिकाणी क्ष-किरण तंत्रज्ञाची नियुक्ती असली तरी मशीनच नसल्यामुळे तंत्रज्ञावरचा वर्षाकाठचा लाखो रुपयाचा पगार बेकार जात आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी उपोषण सुरु करण्यात आले.गेल्या एक दोन वर्षात या ग्रामीण रुग्णालयात आपसातील वादामुळे मोठ्या प्रमाणावर बेशिस्त वाढली आहे. काही दिवसापूर्वी चिमूरचे तत्कालिन आमदार विजय वडेट्टीवार यांना या वादाचा चांगलाच अनुभव आला होता. त्याचवेळी त्यांनी आरोग्य उपसंचालकांपर्यंत या बाबीची तक्रार केली होती. उल्लेखनीय बाब अशी की, नागपूर विभागाच्या आरोग्य उपसंचालकपदी नागभीड येथीलच रहिवासी डॉ. संजय जयस्वाल कार्यरत आहेत. आरोग्य उपसंचालकांच्या जन्म आणि कर्मभूमीत ग्रामीण रुग्णालयाची अशी अवस्था असेल आणि शासनाचा अतिरिक्त ३५ टक्के व्यवसाय शोध घेवूनही खासगी रुग्णालय चालवित असतील तर सामान्य माणसाने कुणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे. उपरोक्त प्रकरणाची वैद्यकीय विभाग काय दखल घेते याकडे नागभीडकरांचे लक्ष लागले आहे.ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे चौकशी करणे गरजेचे आहे. दरम्यान यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश पणेकर यांना विचारणा केली असता डिझेल आणि जेवणाच्या बिलाबाबत संदिग्ध उत्तरे दिली. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी उपोषण सुरु
By admin | Updated: November 25, 2014 22:52 IST