आता प्रतीक्षा पावसाची : शेतातील लगबग वाढलीचंद्रपूर: रामागील वर्षी अतवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीजा पुन्हा नव्या उमेदीने खरिप हंगामासाठी सज्ज झाला आहे. उन्हाच्या दाहकतेची पर्वा न करता शेतकर्यांची शेतातील लगबगही वाढली आहे. मशागतीपूर्व सर्वच कामे आता अंतिम टप्प्यात असून आता केवळ प्रतीक्षा पावसाची आहे.मागील वर्षी शेतकर्यांनी मोठय़ा उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठय़ा आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने आपले उग्र रुप दाखविणे सुरू केले. गरज नसताना पाऊस मुसळधार स्वरुपात अविरत पडतच राहिला. जुलै, आगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला होता. जिल्ह्यात तब्बल चारवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही जिल्ह्याचा दौरा करावा लागला होता. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार, २ लाख १६ हजार ४५0 हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. अनेक शेतजमीन पार खरडून गेली आहे. अनेक ठिकाणी शेतीमध्येतलावासारखे पाणी साचून होते. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना शेती करणे अशक्य झाले होते. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. अतवृष्टीची नोंद शासनदरबारीही घेण्यात आली. मात्र शासनाची मदत शेतकर्यांचे अश्रू पुसू शकली नाही. त्यानंतर रबी हंगामातही पावसाने दगा केला. ऐन पिक कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकर्यांचे पीक उद्ध्वस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकरी रबी हंगामातही फेडू शकला नाही.निसर्गाची ही अवकृपा विसरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरिपाची तयारी करीत आहे. शेतातील नांगरणी, वखरणीची कामे जवळजवळ आटोपत आली आहेत. शेतातील कचरा स्वच्छ झाला आहे. अनेक शेतकर्यांनी शेणखतही शेतात टाकले आहे. सध्या सुर्याचा पारा ४७ अंशापार गेला आहे. उन्हाची दाहकता असह्य होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकर्यांचे संपूर्ण कुटुंबच उन्हाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. यंदा कृषी विभागाने साडेचार लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ६0 हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन १ लाख ४0 हजार हेक्टर व सर्वात कमी कापूस एक लाख १0 हजार हेक्टर, असे लागवड क्षेत्र आहे. बहुतांश शेतकर्यांची हंगामपूर्व मशागतीची कामे आटोपली आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र यंदा वरूणराजा कृपा करेल की अवकृपाच दाखवेल, हे येणारी वेळच सांगू शकणार आहे.
हंगामपूर्व मशागतीला वेग
By admin | Updated: June 7, 2014 01:45 IST