सिंदेवाही : सिंदेवाहीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भर घालणारे येथील समाज मंदिर व सभागृह ३० वर्षांपूर्वी २० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आले. मात्र दहा वर्षांपासून येथील समाज मंदिर धूळ खात पडले आहे. दुरुस्ती केव्हा होईल, या विवंचनेत समाज मंदिर अश्रू ढाळीत उभे आहे. सभा, संमेलन, मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे, या उद्देशाने सिंदेवाही ग्रामपंचायतीने १९८३ मध्ये समाज मंदिर बांधले. त्यानंतर १९८५ मध्ये आमदार निधीतून पाच लाख रुपये खर्च करून सभागृह व त्यावर शेड बांधून शेडवर सिमेंट पत्रे लावण्यात आले. सभागृहासमोर लोखंडी गेट बसविण्यात आले. त्या कालावधीत समाज मंदिरात सभा, संमेलन, मेळावा, शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न व नाटके होत असत. या मंदिरात एक उंच व्यासपीठ व व्यासपीठाला लागून दोन खोल्या आहेत. समोर प्रेक्षकाला बसण्याकरिता एका भव्य सभागृहाची व्यवस्था आहे. पण सद्य:स्थितीत नागरिकांना रस्त्याने जाताना विदारक दृश्य समोर दिसते, ते म्हणजे समाज मंदिराची दुर्दशा. सद्या सभागृहावरील सिमेंट पत्रे ठिकठिकाणी तुटलेले असून पावसाळ्यात संपूर्ण सभागृह गळते. व्यासपीठ व सभागृहातील खोलीचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या आहेत. समाज मंदिरात विद्युत व्यवस्था नाही. सभागृहासमोरील लोखंडी गेट बेपत्ता आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी या ठिकाणी भिकाऱ्यांचे बिऱ्हाड मुक्कामाला असते. जनावरांचेही वास्तव्य असते. पूर्वी लग्न समारंभ व नाटकाकरिता समाज मंदिर किरायाने दिल्या जात होते. त्यावेळी दरवर्षी लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत होते. परंतु आता आवश्यक व्यवस्था नसल्यामुळे या समाज मंदिरात होणारे कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळे सिंदेवाहीची शोभा वाढविणारे व उत्पन्नात भर घालणारे समाज मंदिर बेवारस स्थितीत पडले आहे. (तालुका प्रतिनिधी)
२० लाखांचे समाज मंदिर धूळ खात
By admin | Updated: March 11, 2015 01:06 IST