गणेश मंडळांची तारांबळ : शेतकऱ्यांना दिलासा चंद्रपूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून बुधवारीही विजेच्या कडकडासह धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गणरायाच्या स्थापनेसाठी सज्ज असणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र झाला. बुधवारी सायंकाळी ४ वाजता चंद्रपुरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे पावसाचा वेग अधिक होता. त्यामुळे शहरात मूर्ती विक्रीसाठी दुकाने लावणाऱ्या विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर गोंडपिपरी, सावली, मूल, बल्लारपूर, कोरपना, वरोरा, ब्रह्मपुरी, घुग्घुस, नागभीड, चिमूर तालुक्यातही धुव्वाधार पाऊस झाला. भद्रावती येथील आठवडी बाजार असल्याने विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे अनेकांना रस्त्यावरील व्यवसायिक प्रतिष्ठाणमध्ये उभे राहावे लागले. घुग्घुस येथे ४ तास पाऊस झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती असून नाव मात्र कळू शकले नाही. दरम्यान चंद्रपुरात झालेल्या पावसाने अनेक मार्गावर पाणी साचले. ऊर्जानगर मार्गावर तसेच जयंत टॉकीज चौकात एक ते दीड फूट पाणी होते. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करून वाहने काढावी लागली. चंद्रपुरात सुमारे दीड ते दोन तास पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केला. (लोकमत चमू)
जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस
By admin | Updated: September 17, 2015 00:50 IST