आयुधनिर्माणी (भद्रावती) : भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आयुधनिर्माणी कारखाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना डिफेन्स कॅन्टीनमधून ज्या प्रमाणे सवलतीच्या दरात जिवनावश्यक गृहोपयोगी वस्तूंचा विशेष सवलतीच्या दरात पुरवठा केला जातो, अगदी त्याच सवलतीप्रमाणे या कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या पेंशनधारकांनाही पुढे डिफेन्स कॅन्टीनमधून संसारोपयोगी साहित्य मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. आयुधनिर्माणी कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचारी व कामगारांना याच विभागांतर्गत येणाऱ्या डिफेन्स कॅन्टीन मधून जीवनोपयोगी विविध वस्तू विशेष सवलतीच्या दरात प्राप्त होतात. विविध प्रकारचे पंखे, प्रवासी बॅग, सौंदर्य प्रसाधने, तेल, साबण, पादत्राणे, कुकर यासारख्या नित्योपयोगी वस्तू बाजारभावापेक्षा अधिक प्रमाणात स्वस्त मिळत असल्याने निर्माणी कामगार येथूनच खरेदी करतात. प्रतिमाह पाच हजार पाचशे रुपयांपर्यंतच्या वस्तु या कॅन्टीनमधून खरेदी करतात येत असल्याचे कळते. या कारखान्यात सेवाकाळात पूर्ण वेतन मिळत असतानाही ही सेवा मिळते, हे विशेष! परंतु सेवानिवृत्तीनंतर अर्ध्या पगारावर कुटुंब चालविताना मात्र कामगारांना आर्थिक कळ सोसावी लागायची. संसाराचा गाडा चालविताना नोकरी काळात मिळणारी कॅन्टीनची सवलत मनाला क्लेशदायी ठरायची. ज्या काळात सवलतीच्या दरात गृहोपयोगी वस्तू मिळायलाच पाहिजे त्याच वयात त्या मिळत नसल्याने सेवानिवृत्तीधारक आयुध निर्माणी कामगार कमालीचे त्रस्त होते. सेवानिवृत्तीनंतरही कॅन्टीनमधील वस्तू सवलतीच्या दरात मिळाव्यात यासाठी त्यांच्या संघटना कार्यरत होत्या. आपल्यापरीने आंदोलनेही करीत होत्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आता शासनाने आयुधनिर्माणी कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या पेंशनधारकांनाही डिफेन्स कॅन्टींगमधून गृहोपयोगी वस्तू सवलतीच्या दरात पुरविण्याचा महत्त्ववूर्ण निर्णय घेतल्याने डिफेन्स पेंशनधारकांना आता अच्छे दिन येणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे पेंशनधारक निर्माणी कर्मचाऱ्यांना आपली आर्थिक घडी नीट सावरण्याची संधी मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार जवळपास चार हजार सेवानिवृत्तांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येते. या दिशेने प्रक्रिया प्रारंभ झाल्याची माहिती आहे. संबंधिताने आपला अर्ज भरुन पॅनकार्ड, आधार कार्ड वैगरे आवश्यक माहितीसह कार्यालयास द्यायचे आहे. सविस्तर माहिती डाटा प्राप्त होताच या कर्मचाऱ्यांचे स्मार्ट कार्ड निघणार आहे. त्यानंतर कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी तडीस गेल्याने सेवानिवृत्त निर्माणी कामगार पेंशनधारकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता या योजनेचा लाभ मिळवून देणारे स्मार्ट कार्ड हातात कधी पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
आयुधनिर्माणी पेंशनधारकांनाही मिळणार सवलतीचे स्मार्टकार्ड
By admin | Updated: September 28, 2015 01:14 IST