चंद्रपूर : शिस्तीचा संबंध आरोग्यासोबत जोडल्याने वरोरा येथील सेंट अॅनिस पब्लिक स्कूल येथील एका विद्यार्थ्यांला गंभीर आजाराला सामोरे जावे लागले. त्यामुळे पालक अरुण उमरे यांनी प्राचार्य ब्लेसी पीटर यांना केंद्र सरकारचा आरटीई अॅक्ट आणि शिस्त याबाबत अवगत करण्याची मागणी एका निवेदनातून चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे. वरोरा येथील मोकाशी ले-आऊट मधील भैरव अरुण उमरे हा विद्यार्थी सेंट अॅनिस पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पाचवी (ब) मध्ये शिकत आहे. त्याची अंतिम परीक्षा २६ मार्चपासून सुरू झाली. त्याने परीक्षेचा पहिला पेपर दिला. परंतु अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर डॉक्टरांकडे औषधोपचार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याची आई शारदा उमरे भैरवला सुटी मिळावी, यासाठी शाळेत गेल्या. शाळेच्या प्रिन्सीपल ब्लेसी पीटर यांना आईने भैरवला उलटी, हगवण आणि तापाचा त्रास असल्याने सांगितले. परंतु प्रिन्सीपल ब्लेसी पीटर यांनी भैरवला सुटी न देता पेपर देण्याचे फर्मान सोडले. वेळेवर परीक्षा घेणे ही आमच्या शाळेची शिस्त आहे, हेही सांगायला विसरल्या नाहीत, असे पालक अरुण उमरे यांनी निवेदनात म्हटले आहे.प्रकृतीच्या कारणाने माझ्या मुलाची पेपर सोडविण्याची मानसिकता नसतानाही त्याला पेपर सोडवायला लावल्यामुळे त्याची तब्येत पुन्हा बिघडली. पेपर सोडवित असताना शोचास आणि उलटीचा त्रास वाढला. त्यानंतर त्याला दोनवेळा उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखविण्यात आले. परंतु त्याच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्यामुळे लगेच त्याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रिन्सीपल ब्लेसी पीटर यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेतल्यामुळे हा गंभीर प्रकार घडला, असा आरोप अरूण उमरे यांनी निवेदनातून केला आहे. माझ्या मुलाच्या बाबतीत जो गंभीर प्रकार घडला, तो इतरांच्या बाबतीत घडू नये, तसेच शिस्तीचा संबंध आरोग्याशी जोडू नये, यासाठी वरोरा येथील सेंट अॅनिस पब्लिक स्कूलच्या प्रिन्सीपल ब्लेसी पीटर यांना शिस्त आणि आरटीई अॅक्टबाबत अवगत करावे, अशी मागणी पालक अरुण उमरे यांनी निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)
आजारी विद्यार्थ्यांला सुटी नाकारली
By admin | Updated: April 1, 2015 01:21 IST