घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरे येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्थानांतरण झाले. मात्र रिक्त पदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली नसल्याने येथील रुग्णसेवा कोलमडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात २६ गावांचा समावेश आहे. यात देवाडा (बुज.), घाटकुळ, घोसरी, वेळवा व नवेगाव मोरे ही पाच उपकेंद्र आहेत. व्याप्त क्षेत्रानुसार येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती नियमितपणे गरजेची आहे. येथे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाली असून महिन्याभरापासून रिक्त पदावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास वरिष्ठ अधिकारी दुर्लक्षित आहेत.केंद्रातील ओपीडी सांभाळण्याकरिता १०-१५ कि.मी अंतरावरील केंद्रातील वैद्यकीय अधिकारी जात असले तरी वेळेवर रुग्णांना उपचार मिळत नसल्याने ताटकळत रहावे लागते. परिणामी खासगी उपचार करावा लागत असुन रुग्णांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे.कार्यक्षेत्रातील अनेक गावे संवेदनशील आहे. अनेकवेळा साथीच्या प्रकोपाने अनेक रुग्ण बाधित होत असतात. सद्य:स्थितीत गावांमध्ये चिखलयुक्त घाण पसरलेली असल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यामुळे रुग्ण तापाने फणफणत आहेत. परंतु घोसरी उपकेंद्रातील आरोग्य सेविका व आरोग्य सेवकाचे पद रिक्त असताना वरिष्ठांनी दखल घेतली नाही. प्रसूतीकरिता महिलांना इतरत्र नेताना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सेवकाचे पद रिक्त असल्याने आरोग्य केंद्र आजारी पडलेले आहे. क्षेत्रातील रुग्णासह गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांना अधिकत्तर फटका बसत आहे. याकडे लक्ष देवून येथील रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
आरोग्य केंद्रातील सेवा कोलमडली
By admin | Updated: August 3, 2014 23:19 IST