चंद्रपूर : चंद्रपुरातील गौरव लॉनवर अलिकडेच पार पडलेल्या दिव्यांगांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात नाभिक समाजातील कारागिरांनी वरांची नि:शुल्क दाढी, कटिंग आणि मसाज करून दिली तर महिलांनी वधुंच्या हातावर मेहंदी लावून सजावट करून दिली.आस्था चारिटेबल ट्रस्ट आणि वर्धमान सोसायटीच्या वतीने चंद्रपुरात २४ दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या आदल्या सायंकाळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष श्याम राजुरकर आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश एकवनकर यांच्या पुढाकारात हा उपक्रम राबविण्यात आला. केशकर्तनालय चालवून अथवा दुसऱ्या सलूनमध्ये कारागिर म्हणून काम करणाऱ्या चंद्रपुरातील राजू कोंडस्कर, उमेश नक्षीणे, विश्वनाथ नक्षीणे, दिनेश चौधरी, सचिन दैवलकर, संदेश चल्लीरवार या समाजबांधवांनी या सोहळ्याच्या स्थळी जावून वरांची मोफत दाढी, कटींग, मसाज करून दिली. तर समाजातील महिलांनी प्रेमज्योती नाभिक महिला मंडळाच्या पुढाकारात वधुंच्या हातावर मेहंदी काढून दिली अणि त्यांची केशसज्जा करून सजावट करून दिली. या कामी संध्या कडूकर, सरोज चांदेकर, रंजना राजुरकर, भानुमती बडवाईक, शालू चल्लीरवार, वनिता चल्लीरवार, सिमा वनकर यांचा सहभाग होता. कसलीही अपेक्षा न ठेवता केवळ सेवाभावाच्या हेतुने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दिव्यांगांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सलून कारागिरांची सेवा
By admin | Updated: February 18, 2017 00:39 IST