जिवती : संपूर्ण राज्यभर सलाम मुंबई फाउंडेशनमार्फत ऑनलाइन प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिवती तालुक्यातील शेणगाव येथील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ऋतुजा ईश्वर वारे, प्रतीक्षा प्रकाश शिंदे, माहेश्वरी सदाशिव वारे, प्रतीक्षा प्रेमदास राठोड व वैष्णवी दत्ता माळगे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या प्रशिक्षणात तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती, सत्यता, स्व ओळख आणि स्व आत्मविश्वास, संवादकौशल्य सवयीची जडणघडण, वाईट सवयी ना करण्याचे कौशल्य, शाळास्तरावरील बाल पंचायत, भूमिका व जबाबदारी, समस्या सोडविण्याच्या पद्धती व सामाजिक समर्थन संकल्पना, ध्येयनिश्चिती ओळख, तंबाखू नियंत्रण कायदा २००३, कौशल्य विकास नेतृत्व आणि लेखन कौशल्य, मीडिया आणि मीडियाचे वेगवेगळे प्रकार, पोलीस विभाग व अन्न आणि औषध प्रशासन यांनी सोबत काम करणे इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना १५ व २८ जानेवारीला विविध विषयांवर तपशिलावर मार्गदर्शन होणार आहे. अंतिम बाल परिषद सराव ३ फेब्रुवारी, २०२१ व राज्यस्तरीय बाल परिषद ४ फेब्रुवारी, २०२१ला आयोजित केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील २५ विद्यार्थी व पाच तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. जिवती तालुक्यातून बाबा कोडापे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहे.