बल्लारपूर : उमरी येथील शिवाराच्या बाजूला असलेल्या कक्ष क्रमांक ४४२ येथे वन तलाव वरच्या बाजूला शनिवारी दुपारला पट्टेदार वाघ वावरताना दिसला. याच शिवारात गावातील हरीश गिरिधर टेकाम हा तरुण पाणी आणायला गेला असता त्याला वाघ दिसला. तेव्हा तो घाबरून झाडावर चढला.
प्रत्यक्षात वाघ एक ते दीड तास झाडाखाली उभा होता. सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी बल्लारपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना दिली. त्यांनी चमू पाठवून फटाके फोडले व वाघाला जंगलात पळवून लावले. झाडावर चढलेला हरीश टेकाम या तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. क्षेत्र सहायक, वनपाल प्रवीण बिबटे, वनरक्षक पायल शेडमाके, ज्योती अटेल, माजी सरपंच मनोज मूलकवार, प्रवीण चिचघरे, राकेश गव्हारे, संदीप मडावी व गावकऱ्यांच्या मदतीने वाघाला जंगलात पळवून लावले.