चंद्रपूर : राज्य शासनाने वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची घोषणा केली असताना रेतीची नियमबाह्य व ओव्हरलोड वाहतूक करून पर्यावरणाला धोका ठरलेल्या रेती नेणाऱ्या २३ वाहनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी रोखले. ओव्हरलोड वाहतुकीची माहिती देताच बल्लारपूर, चंद्रपूरचे तहसीलदार, एसडीओ, आरटीओ यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी २३ वाहनापैकी केवळ ११ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.या कारवाईनंतर मार्डा शिवाजी येथील नदीपात्रात रात्रीच्या वेळेत बेकायदेशिरपणे रेती उत्खनन करणाऱ्या तीन जेसीबी मशिन्सवरही तहसीलदारांनी कारवाई केली. ही वाहने खंडेलवाल, एफएसव्ही व इतर ट्रान्सपोर्ट कंपनीची आहेत. वर्धा नदी पात्रात अहोरात्र २४ तास जेसीबी मशीनने रेतीचे उत्खनन करून वाहनांद्वारे ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. सदर रेती घाटाची लीज राज्य शासनाने वेकोलिला दिली आहे. वेकोलिने रेती उत्खनन व वाहतूक करण्याचे कंत्राट ट्रान्सपोर्ट कंपन्यांना दिले आहे.रेती उत्खनन व वाहतूक करताना ट्रान्सपोर्ट व वेकोलि प्रशासनाद्वारे शासकीय नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रेतीचे जेसीबी मशीनने दिवसरात्र उत्खनन करून वाहनातून ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. सदर गैरप्रकारामुळे पर्यावरणाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. याचा फटका नागरिकांना महापुराच्या स्वरूपातून भोगावा लागत आहे.राज्य शासनाने रेतीमाफियांवर कडक कारवाई करण्याची घोषणा केली आहे. याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्याने मनसेने सोमवारी रात्रीच्या सुमारास नियमबाह्यपणे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या २३ वाहनांना पठाणपुरा गेटसमोर रोखले. याची दखल थेट जिल्हाधिकाऱ्यांनी घेत प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. यामुळे घटनास्थळी एसडीओ, आरटीओ, चंद्रपूर व बल्लारपूरचे तहसीलदार, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी भेट देत ११ वाहनावर कारवाई केली. मात्र इतर वाहन प्रशासकीय अधिकाऱ्यांना न जुमानता फरार झाले. ही वाहने फरार होत असतानाही प्रशासनाने याकडे लक्ष का दिले नाही, याबाबत मनसेकडून शंका उपस्थित केली जात आहे.पर्यावरणाच्या रक्षणासाठी न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशांना वेकोलि व्यवस्थापन, ट्रान्सपोर्ट मालक धाब्यावर बसवून रात्रीच्या सुमारास नियमबाह्य तीन जेसीबी मशीनच्या साहाय्याने वाहनातून उत्खनन करीत आहे. ओव्हरलोड रेतीची वाहतूक करीत आहे. चंद्रपुरातील जनतेला रेतीच्या अवैध उत्खननामुळे महापुराचा वारंवार फटका बसून जीवहानी मालमत्तेची अतोनात हानी होत आहे. याची जाणीव ठेवून मनसे शहराध्यक्ष मनदीप रोडे यांनी पदाधिकारी व नागरिकांच्या सहकार्याने ही वाहने रोखली. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट, रयतवारी वेकोलि सब एरिया मॅनेजरवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.कारवाई न केल्यास जनतेच्या हितासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे. प्रशासनाच्या कारवाईनंतरही नियमबाह्य व ओव्हरलोड रेती वाहतूक सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन छेडणार असा इशाराही मनसेने दिला आहे. यावेळी नितीन बावणे, संदीप अरडे, कमलेश कुळमेथे, सागर मरसकोल्हे, आकाश पाचपोर, आशीष कोपुलवार, अमोल नैताम, रोहन आगडे व नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
रेतीची ओव्हरलोड वाहने रोखली
By admin | Updated: April 2, 2015 01:32 IST