फोटो
सिंदेवाही: तालुक्यातील रेती घाटावर मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. यावर आळा घालण्यासाठी अद्यापही महसूल प्रशासनाला यश आले नाही. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तर दुसरीकडे अव्वाच्या सव्वा किंमतीत सामान्य नागरिकांनी रेती घ्यावी लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव अद्यापही झाले नाही. असे असले तरी मोठ्या प्रमाणात तस्कर रेतीचा साठा करीत असून मागणीनुसार पुरवठा केला जात आहे. खनन, अवैध वाहतूक, साठवणूक हा प्रकार महसूल विभागाच्या डोळ्याखाली सुरू आहे. मात्र कारवाई होताना दिसत नाही. पर्यावरण प्राधिकरणाच्या नियमांमुळे मागील तीन वर्षांपासून तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नाही. तालुक्यातील सहा रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निविदा उघडण्यात येईल. असे सांगण्यात येत आहे. मात्र सध्यास्थितीत मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असल्याने यावर आळा घालणे गरजेचे आहे.