देवाडा बूज: पोभुर्णा तालुक्यातील जुनगाव वैनगंगा नदीचा घाट हे रेती तस्कराचे माहेरघर बनले आहे. संबंधित घाटाची लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने रेती तस्कराचे चांगलेच फावत आहे.
रात्रीचा फायदा घेत रेतीचा उपसा करून बाहेर ठिकाणी दोन ते अडीच हजार रुपयांनी विक्री केली जात आहे. अधूनमधून रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. तरीही तालुका महसूल विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नदीमधून रेतीचा अवैधरित्या उपसा केला जात असल्याने नदीचे पाणी आटल्या जाऊन नळयोजनेच्या पिण्याच्या पाण्याचे जलसंकट उभा ठाकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अवैध रेतीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने पथक नेमण्यात आल्याची माहिती आहे. परंतु पथक सध्या कुठे कार्यरत आहे, हेच कळत नाही.