बल्लारपूर/राजुरा : मध्य चांदा वन विभागातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रांतर्गत जुनोना जंगलातील कक्ष क्रमांक ४९० मध्ये आणि विरुर वन परिक्षेत्रातील लक्कडकोट येथील एका शेतात सांबराची शिकार झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणातील सहा जणांना अटक करण्यात आली त्यांना वनकोठडीत ठेवण्यात आले आहे.बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील घटनेत अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोषसिंग जीतसिंग टाक (२५) व रमेश आदेडउतावार (३४) असे तर विरुर वन परिक्षेत्रातील घटनेत नामदेव रामटेके (३६), गुलाब दुर्गे (५२), कवडू रतनकर (५३) आणि शंकर गोडशीलवार (५०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.वन्यजीवांची शिकार करुन मासाची विक्री करण्यासाठी बल्लारपूर वनक्षेत्रातील जुनोना जंगलात शिकाऱ्यांची टोळी वावरत असल्याचा सुगावा वनरक्षक व वनाधिकाऱ्यांना लागला. दरम्यान शनिवाऱ्या रात्री याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. भरमार बंदुकीसह शिकाऱ्यांची टोळी जुनोना जंगलात वन्य जीवांच्या मागावर असताना वन कर्मचाऱ्यांनी सर्च आॅपरेशन राबविले. मध्य चांदा वनविभागाच्या फिरते पथकातील एसीएफ झाडे, कोठारी वनपरिक्षेत्रातील पथक आणि बल्लारपूर वन परिक्षेत्रातील सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर, जुनोना येथील वनरक्षक मधुकर शेडमाके, कारवाचे मनोज धुर्वे व विसापूरच्या वनरक्षक निश्चल धात्रक यांच्या पथकासह रामनगर पोलिसांच्या सहकार्याने शिकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. सर्च आॅपरेशन सुरु असताना चंद्रपूर-जुनोना मार्गावर रस्त्याच्या १०० मीटर आतील अंतरावर शिकाऱ्यांचा टोळीने मारलेला सांबर मृतावस्थेत आढळून आला. घटनास्थळावरुन सांबराला कारवा येथील वन विभागाच्या रोपवाटीकेत वनकर्मचाऱ्यांनी आणला. आज दुपारी १ वाजता ताडोबा अंधारी व्याघ प्रकल्पाचे वन्यजीव वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी सांबराची मृत तपासणी केली. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपूर व विरुर वनपरिक्षेत्रात सांबराची शिकार
By admin | Updated: February 8, 2015 23:31 IST