गोंडपिपरी: तालुक्यात सध्या मार्च अखेरीची विकासकामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाची धडपड सुरु आहे. तालुक्यातील वेळगाव-सोनापूर (दे.) रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु आहे. चंद्रपूरच्या श्रीसाई कंन्सट्रक्शन कंपनी मार्फत करण्यात येणाऱ्या या कामात प्रचंड गैरव्यवहार होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. अभियंते व कंत्राटदार यांच्या संगणमताने अत्यंत निकृष्ट काम केल्या जात असून गुणनियंत्रक दक्षता विभागामार्फत सदर कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आहे.तालुक्यातील धाबा- लाठी- तोहोगाव- कोठारी या मार्गावर दरवर्षी सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत कोट्यवधींची कामे केली जातात. मात्र कंत्राट घेणारे व नियंत्रण ठेवणारे अभियंते यांच्या एकोप्यातून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये भ्रष्टाचार केला जातो. त्यातून रस्ता बांधकामाचा दर्जा घसरतो. सध्या धाबा-लाठी मार्गावरील वेळगाव-सोनागपूर (दे.) या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. या कामाच्या निविदा उघडून आठवडाही लोटण्यापूर्वीच ई-निविदा प्रणालीतून काम मिळविणाऱ्या श्रीसाई कंन्सट्रक्शन कंपनीने यांनी झपाट्याने कामाला सुरुवता केली आहे. कामासाठी लागणारी गिट्टी व डांबर मिश्रण साहित्य हे तब्बल ८५ हून अधिक किलोमिटरवरुन आणल्या जात असल्याने मिश्रणाचे तापमान कमी होते. त्यातच कमी प्रमाणात डांबराचा वापर करु असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.६० किमीच्या अंतरावरुन डांबर मिश्रीत गिट्टी आणणे अनिवार्य असताना येथील उपअभियंता एस. सी. तव्वर शाखा अभियंता अमरशेट्टीवार यांनी कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. (तालुका प्रतिनिधी)
वेळगाव- सोनापूर रस्ता बांधकामात गैरव्यवहार
By admin | Updated: March 20, 2015 01:13 IST