सरपंचाला धक्काबुक्की : न्यायालयाच्या निकालाने महिला संतप्त घुग्घुस : न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत महिलेने ग्रामविकास अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना नकोडा ग्रामपंचायतीत मंगळवारी घडली. त्या महिलेने महिला सरपंचालाही धक्काबुक्की करून ग्रामपंचायतीच्या साहित्याची नासधूस केली.ममता मोरे असे महिलेचे नाव आहे. नकोडा ग्रामपंचायत निवडणुकीत घरी शौचालय नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी छाणणीच्या दिवशी ममता मोरे यांचा अर्ज अवैध ठरविला. मात्र या निर्णयाविरोधात मोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मंगळवारी निर्णय देताना निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवून नामांकन अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे मोरे यांना निवडणूक लढण्यास मुकावे लागले. निकाल आपल्या बाजूने न आल्याने सदर महिलेने मासिक सभेदरम्यान ग्रामविकास अधिकारी ए.के. जेमटे यांना कार्यालयात मारहाण केली. तर सरपंच तनुश्री बांदुरकर यांना धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. नकोडा ग्रामपंचायत वार्ड क्र. १ च्या सप्टेंबरमध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वर्तमान सरपंच तनुश्री बांदूरकर यांनी दोन वार्डमधून निवडणूक लढविली. त्या दोन्ही वार्डमधून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी वार्ड क्रमांक एकमधील सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने व उपसरपंच शेख आसिफ शेख हनिफ यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या जागेकरिता २४ आॅगस्टला पाोटनिवडणूक घेण्यात आली. वार्ड क्रमांक एक मधून किरण बांदूरकर व ममता मोरे यांनी नामांकन पत्र भरले. मात्र मोरे यांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले व वॉर्डाची निवडणूक स्थगित करण्यात आली. या निर्णयाविरोधात ममता मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने निवडणूक अधिकारी यांचा निर्णय कायम ठेवला. मारहाण प्रकरणी ग्रामसेवक जेंगठे यांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तर ममता मोरे यांनीही ग्रामविकास अधिकाऱ्याने विनयभंग केल्याची तक्रार केली असून गुन्हे दाखल झाले नव्हते. (वार्ताहर)
ग्रामविकास अधिकाऱ्याला महिलेकडून मारहाण
By admin | Updated: August 31, 2016 00:38 IST