घोडपेठ: येथून जवळच असलेल्या चपराळा येथील मजुरांना रोजगार हमी योजनेद्वारा कामाची मागणी करुनही काम मिळत नसल्याने या परिसरातील मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.चपराळा येथील अहिल्याबाई गेडाम, गीता पोतराजे, जोशिला सिडाम, पपिता मडावी, रेखा येरगुडे व इतर अशा एकूण १२ महिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नमुना चार भरुन २४ सप्टेंबर २०१४ रोजी कामाची मागणी केली होती. मात्र अर्ज करुनही दोन महिन्यांपर्यंत काम उपलब्ध न करुन दिल्यामुळे १९ नोव्हेंबर २०१४ रोजी अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन (न्यास) महाराष्ट्र शाखा भद्रावतीचे कार्यकर्ते चपराळा येथील गोपाल बोंडे यांनी तहसीलदारांना रोहयोच्या कामाच्या मागणीचे स्मरणपत्र दिले. त्यानंतर ग्राम पंचायतीकडून या मजुरांना काम देण्यात आले. मात्र सहा दिवसानंतरच मजुरांचे काम बंद करण्यात आले. त्यानंतर ग्राम पंचायतीकडे पुन्हा तक्रार करण्यात आली. यामुळे काही दिवसानंतर ग्राम पंचायतीकडून फक्त एक आठवड्याचे काम मजुरांना देण्यात आले. मात्र त्यानंतर अजुनपर्यंत गावातील मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यात आले नाही. त्यामुळे या मजुरांनी उदरनिर्वाह कसा करावा, हा यक्षप्रश्न सध्या त्यांना पडला आहे. कामाची मागणी केल्यापासून किंवा अर्ज सादर केल्यापासून पंधरा दिवसांचे आत अकुशल रोजगार पुरविण्यात यावा. किंवा रोजगार पुरविणे अशक्य ठरल्यास संबंधित मजुरास कायद्यानुसार बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, असा नियम आहे. तसेच रोहयोच्या मजुरांना शंभर दिवस कामाची शासन हमी देते.मागील वर्षी २२ एप्रिलला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी चपराळा गावाला भेट दिली होती. त्यामध्ये पांदण रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे काम अर्धवट सोडलेले आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना पुर्ण करण्यात यावी. मात्र नमुना क्र. १० ठेवण्यात आला नाही. तो तात्काळ ठेवून पूर्ण करण्यात यावा, असा अभिप्रायही जिल्हाधिकाऱ्यांनी या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीच्या भेट पुस्तिकेमध्ये नोंदविला होता.मात्र मजुरांना कामच दिले नाही. मजुरांना त्वरित काम देण्यात यावे अशी मागणी चपराळा येथील गोपाल बोंडे यांनी एका निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)
रोहयोच्या मजुरांची उपासमार
By admin | Updated: March 13, 2015 01:03 IST