मोहाळी (नले.) : अनेक वर्षांपासून मोहाळी परिसरातील रस्त्याचे पूर्णत: डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते, अशी परिसरातील रस्त्याची दैनावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहेत. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे मोहाळी परिसरातील रस्त्यान मार्गक्रमण करताना डोकेदु:खी ठरत आहे. तर एसटी बस व इतर वाहनांना या रस्त्याने मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मोहाळी, कळमगाव, सिंदेवाही हा मार्ग नेहमीच वर्दळीचा मार्ग आहे. पाच वर्षांपूर्वी आलेल्या महापुराने कळमगाव या गावाशेजारी हा रस्ता पूर्णत: उखडला. त्यामुळे या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.याच ठिकाणी दुचाकी वाहनधारकांना अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कुकडहेटी जाणाऱ्या मार्गात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. उमा नदीच्या पुलाशेजारीच सिंदेवाहीकडे जाणारा मार्गही मोठ्या प्रमाणात उखडला आहे. या मार्गावरही पावसाळ्याच्या दिवसात अनेक दुचाकी वाहनधारक अपघात होऊन पडले आहेत. या मार्गाने मार्गक्रमण करताना अनेक वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच विसापूर मार्गे मोहाळी येणाऱ्या रस्त्यावरील डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असते. त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना रस्ता पार करावा लागत आहे.तसेच पेठगाव मार्ग भादुर्णा,उसर्ला, मारोडा, मूल या मार्गाचीही अंत्यत दैनावस्था असून या मार्गावरही मोठमोठे खड्डे पडेल आहेत. या रस्त्यांची दैनावस्था १० ते १२ वर्षांपासूनची आहे. पेठगाव, भादुर्णा, मूल मार्ग हा कमी अंतराचा असल्याने अनेक वाहनधारक पूर्वी या मार्गाने मार्गक्रमण करीत असत. मात्र हा रस्ता पूर्णत: उखडल्याने राजोली मूल असा सात किलोमिटर अधिकचा फेरा घालून जावे लागत आहे. एवढी या रस्त्याची दैनावस्था आहे. त्यामुळे या मार्गाने चालणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तर एसटी बसने प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात धक्के खात प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गाने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध आजारांनी ग्रासले आहे. रस्त्याची अशी दैनावस्था झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे की झोपेचे सोंग घेऊन आहे, असा प्रश्न या परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधींनाही ही गंभीर समस्या माहित असताना चे मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांत असंतोष खदखदत आहे. त्यामुळे उखडलेले रस्ते व रस्त्यात पडलेले खड्डे बुजवून या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
मोहाळी परिसरातील रस्त्यांची दैना
By admin | Updated: December 2, 2014 23:04 IST