उपरी : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत सावली तहसील कार्यालयाच्या वतीने व्याहाड (खुर्द) मंडळ कार्यक्षेत्रातील नवभारत विद्यालय व्याहाड (बुज) येथे समाधान योजना शिबीर घेण्यात आले.शिबीरात तालुक्यात असलेल्या सर्व विभागाकडून शेतकरी-नागरिकांना विविध साहित्यांचे वाटप ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन आ. विजय वडेट्टीवार यांच्याच हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर सावलीचे तहसीलदार वंदना सौरंगपते, नायब तहसीलदार ए.टी. चन्नावार, एल.जी. पेंढारकर, जि.प. सदस्य दिनेश पाटील चिटनूरवार, वैशाली कुकडे, पं.स. सदस्य अविनाश पाल, सुनील बोमनवार आणि सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.सदर शिबिराप्रसंगी सावलीचे तहसीलदार वंदना सौरंगपते यांनी प्रास्ताविकातून समाधान योजना शिबिराबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र शासन मागील तीन वर्षापासून महाराजस्व अभियान या कार्यक्रमांतर्गत, राज्याच्या प्रत्येक तालुक्यात समाधान योजना शिबिर आयोजित करून त्यामध्ये तालुक्यातील प्रत्येक विभाग सहभागी करून ग्रामीण जनतेपर्यंत त्या-त्या विभागाच्या योजना पोहचविण्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या. या योजनाचा जनतेनी लाभ घ्यावा असे आवर्जून सांगितले तर कार्यक्रमाचे उद्घाटक आ. विजय वडेट्टीवार यांनी महसूल विभागाने समाधान योजना शिबिरातून ग्रामीण जनतेला विविध विभागातील योजनांची माहिती, गरजूंना लाभ देण्याचा उद्देश ठेवून कार्यक्रम आयोजित केला. याचा लाभ उपस्थित नागरिकांनी घ्यावा. यासोबतच या तालुक्यातील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतकरीबांधव असून पावसाअभावी यावर्षी धान पिक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी गोसीखुर्दचे पाणी तालुक्यात आणण्यासाठी क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्नशिल आहे. या वर्षात सावली तालुक्यात सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी इतर विभागाच्या अधिकाऱ्यानेही आपापल्या योजनाची माहिती दिली. (वार्ताहर)
व्याहाड येथे महसूलचे समाधान योजना शिबिर
By admin | Updated: September 13, 2015 00:50 IST