चंद्रपूर : महसूल विभागाचे काम सोपे करण्यासाठी महसूल विभागाला नवीन आकृतीबंध लागू करण्यात येणार आहे. यासाठी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली असून लवकरच त्या दृष्टीने कामेही केली जाणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील एक प्रस्ताव महसूल कर्मचारी संघटनेने तयार केला असून तो जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सादर केला आहे.राज्याच्या प्रशासनात विविध स्वरुपाच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महसूल विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी व लोकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिक तत्परतेने व कार्यक्षमतेने देण्यासाठी सध्या उपलब्ध मनुष्यबळ, महसूल यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आलेली कामे व महसूल प्रशासनाच्या गरजा, याचा एकत्रित अभ्यास करणे आवश्यक झाल्याने राज्य शासनाने याबाबत आदेश काढले. ९ फेब्रुवारी २०१५ च्या आदेशानुसार महसूल विभागाला नवीन आकृतीबंध लागू करण्यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची स्थापना केली आहे.या अभ्यासगटात अन्य सदस्य म्हणून चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, बुलडाणा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, नाशीक जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, व उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह महसूल विभागातील अन्य चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.दरम्यान, महसूल विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा विचार करुन विभागात कमी पडणारे मनुष्यबळ वाढविण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. प्रस्ताव सादर करताना संघटनेचे अध्यक्ष राजू धांडे, सरचिटणीस शरद मसराम, विलास वानखेडे, मनोज आकनूरवार, शैलेश धात्रक, दिलीप गेडाम आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
महसूल विभागाला नवीन आकृतीबंध लागू करण्याची कार्यवाही सुरू
By admin | Updated: June 5, 2015 01:16 IST