चंद्रपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर आळा घालून आरोपीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारूची विक्री सुरू आहे. गुटखाबंदी असताना खुलेआम गुटखा विक्री व तस्करी होत आहे. रेतीघाटाचे लिलाव रखडले असल्याने रेतीघाट बंद आहेत. मात्र अनेक जण ट्रॅक्टर व हायवाच्या साह्याने रेतीची वाहतूक करीत असून बेभाव विक्री करीत आहेत. त्यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडत आहे. तसेच अवैध कोळसा काळाबाजार, सट्टाबाजार, कोंबडबाजार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल गुन्हेगारीकडे होत आहे. त्यामुळे अवैध धंद्यावर आळा घालावा तसेच आरोपींवर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनआंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेश्वर, जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक सचिन भोयर, महिला जिल्हाध्यक्ष सुनिता गायकवाड, जनहित विधिकक्षा जिल्हाध्यक्ष राजू बघेल, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, महिला शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर, प्राध्यापक नितीन भोयर, शुभम सिंग, सूरज अगडे, चिरंजीवी पॉल, तुषार राणा, अशोक मुग्धा, करण तुमसरे आदी उपस्थित होते.