कारवाईची तरतूद : उपाययोजना करण्याचे आदेश चंद्रपूर : धार्मिक स्थळांवरील मूर्तीची विटंबना, दानपेटीची चोरी तसेच इतर धार्मिक साहित्याची चोरी होण्याच्या घटना संपूर्ण राज्यभरातच वारंवार घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी संबंधित धार्मिक स्थळांच्या विश्वस्थांनी उपाययोजना करण्याचे आदेश सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. मागील काही वर्षांत राज्यात अशा प्रकारच्या घटना मोठ्या संख्येने घडल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने अशा घटना रोखण्यासाठी विश्वस्थ संस्थांनी उपाययोजना करण्यासंबंधी धर्मादाय आयुक्तांना आदेश दिले आहेत. या आदेशानुसार चंद्रपूरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर.एन.चव्हाण यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या विश्वस्थ संस्थांना काही उपाययोजना करण्यासंबधी पत्र दिले आहे. सुचविलेल्या उपाययोजनांची पुर्तता करून त्याबाबतची माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना लेखी स्वरुपात कळण्याचे आदेशात म्हटले देण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व धार्मिक संस्थांच्या विश्वस्थांनी सुचविलेल्या उपाययोजना अंमलात आणल्या की नाही, याची पडताळणी करण्यासाठी स्वत: सहाय्यक धर्मदाय आयुक्त किंवा त्यांच्या निरीक्षकांकरवी कोणतीही पूर्व सूचना न देता धार्मिक विश्वस्थ संस्थांंना भेटी देणार आहेत. भेटीदरम्यान, अंमलबजावणी झाल्याचे दिसून न आल्यास विश्वस्थ संस्थांच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांवर व सदस्यांवर महाराष्ट्र न्यास नोंदणी अधिनियम १९५० च्या कलम ६७ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच घडणाऱ्या विपरीत घटनांसाठीही कार्यकारिणी सदस्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धार्मिक संस्थांच्या विश्वस्थांनी सुचविलेल्या उपाययोजना अंमलात आणाव्या, असे आवाहन सहाय्यक धर्मदाय आयुक्त आर.एन.चव्हाण यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
धार्मिक स्थळांची विटंबना रोखण्याची जबाबदारी विश्वस्थ संस्थांवर
By admin | Updated: March 26, 2016 00:41 IST