फोटो : जखमी असलेल्या मांजराला पकडताना फाऊंडेशचे सदस्य.
चंद्रपूर : मागील दोन ते तीन दिवसांपासून येथील तुळशीनगर परिसरात जखमी मांजर फिरत होते. असह्य वेदनांमुळे ते तडफडत होते. यासंदर्भात प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांना माहिती मिळाली. शुक्रवारी सकाळी परिसरात येऊन त्या मांजराला मोठ्या शिताफीने पकडून उपचारासाठी संस्थेच्या आवासामध्ये दाखल करून घेतले. एका मांजराच्या उपचारासाठी फाऊंडेशनने दाखविलेली धडपड वाखाणण्याजोगीच होती.
येथील तुळशीनगर परिसरातील छत्रपती चौकामध्ये वाहनाच्या धडकेमध्ये एका मांजराचा अपघात झाला. यामध्ये मांजराला असह्य वेदना होत होत्या. त्याला चालताही येत नव्हते. येणारे -जाणारे बघून वाहनधारकांवर संताप व्यक्त करीत होते. त्याच्या वेदनेमुळे लहान बालकांसह काही महिलांच्या डोळ्यात पाणी येत होते. दरम्यान, उपचारासाठी काहींना तयारीही केली. दरम्यान, प्यार फाऊंडेशनला यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांनी वेळ न दवडता तत्काळ तुळशीनगर गाठून एका बास्केटमध्ये जखमी मांजराला पकडले आणि दाताळा परिसरात असलेल्या संस्थेच्या रुग्णालयात दाखल केले. यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र रापेल्ली, सदस्य आयुष झाडे आदींनी सहकार्य केले.
---
२२६ पशुपक्ष्यांवर उपचार सुरू
दाताळा परिसरात असलेल्या या फाऊंडेशनमध्ये मोकाट कुत्रे, मांजर, गाढव, पशुपक्षी असे एकूण २२६ पशू उपचार घेत असून काही आजारातून मुक्तही झाले आहे. मात्र या सर्वांची जबाबदारी फाऊंडेशनने उचलली असून समाजातील दानशूरांच्या मदतीतून या प्राण्यांवरील खर्च भागविला जात आहे.
कोट
मोकाट जनावर- पशुपक्ष्यांवर प्रेम करा. त्यांना मारपीट करून जखमी करू नका. त्यांना जमल्यास खाऊ-पिऊ घाऊन त्यांची काळजी घ्या. निसर्गामध्ये या सर्वांचे महत्त्व आहे. त्यांच्यामुळेच निसर्गचक्र चालू आहे. प्यार फाऊंडेशनच्या वतीने मोकाट पशुपक्ष्यांची काळजी घेतली जात आहे.
-देवेंद्र रापेल्ली
अध्यक्ष, प्यार फाऊंडेशन, चंद्रपूर