देवाडा येथील अतिक्रमण : दखल घेण्याची मागणीपोंभूर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथील राजकीय पक्षाशी निगडीत असलेल्या व्यक्तींने बनावट कागदपत्राच्या आधारे बोगस पट्टे मिळविण्याची बाब समोर आली. या प्रकरणात दोषी असलेल्या महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून अतिक्रमण केलेली गुरेढोरे ठेवण्याची जागा मोकळी करुन देण्याची मागणी देवाडा खुर्द येथील संघर्ष समिती व नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे. पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द व रामपूर दीक्षित, कोसंबी रिठ या शेतशिवारामध्ये शासकीय जागेवर वडिलोपार्जित वहिवाट व ताबा नसताना आणि मूळ रेकार्डवर कुठेही जमीन कसत असल्याचा पुरावा नसताना केवळ बनावट कागदपत्राच्या आधारे पुंडलिक बुरांडे यांनी पट्टा मिळविला. महसूल विभाग आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना हाताशी धरुन आर्थिक व्यवहारातून हा पट्टा मिळविण्यात आला. गावातील नागरिकांच्या गुरेढोरे ठेवण्याच्या जागेवर बोगस पट्टेधारकांनी अतिक्रमण केल्याने पाळीव जनावरे ठेवायचे कुठे, असा गंभीर प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.बुरांडे यांनी गुरेढोरे ठेवण्याच्या जागेवर गुराख्यांनी बांबुनी तयार करण्यात आलेले संरक्षण कुंपन आणि विद्यार्थ्यांचे खेळाचे क्रीडांगण ट्रॅक्टरद्वारे उद्धवस्त केले आहे. त्याठिकाणी अतिक्रमण करुन धानपिकांचे बांध काढण्यात आल्याने शाळकरी मुलांना खेळण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावर अकुंश घालण्यासाठी गावातील नागरिकांनी गावात ग्रामसभा घेऊन संघर्ष समितीची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून देवाडा खुर्द, रामपूर दीक्षित, कोसंबी रिठ येथील ज्या शेतकऱ्यांना त्यांची वहिवाट नसताना देण्यात आलेले बोगस पट्टे रद्द करण्यात यावे आणि संबंधित प्रकरणातील कागदपत्राची योग्य चौकशी करुन बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या बोगस पट्टेधारक आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूल येथे आले असताना गावकरी व संघर्ष समितीच्या सदस्यांनी निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)
बोगस पट्ट्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Updated: February 12, 2016 01:37 IST