मनपाने बदलविला निर्णय : अर्ध्या तासातच आटोपली सभाचंद्रपूर : चंद्रपूर शहराचा पाणी पुरवठा मागील अनेक दिवसांपासून कोलमडला आहे. नागरिकांनी वारंवार ओरड केल्यानंतर हा मुद्दा लागोपाठ दोन आमसभेत गाजला. त्यानंतर मनपा प्रशासनाने पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीविरुध्द कारवाईचा बडगा उगारून पाणी पट्टी कर मनपात जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र या आमसभेत पुन्हा हाच विषय चर्चेला आणून निर्णय बदलवित पुन्हा पाणी पट्टी कर उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीत भरण्याविषयी सभागृहात सांगण्यात आले. यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने काही वेळ चांगलाच गदारोळ झाला.चंद्रपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी १ वाजता महानगरपालिकेच्या नवीन इमारतीतील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मागील आमसभेत चर्चेला आलेला जागा आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेसाठी ठेवण्यात आला. मौजा वडगाव येथील सर्व्हे क्रमांक १२३/१ ड क पैकी जुना सर्व्हे क्रमांक ११३ आराजी ०.१३ हेक्टर आर ही जागा विकास योजना आराखड्यानुसार दवाखाना व प्रसुतिगृहासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या जागेच्या संपादनाचा विषय मागील आमसभेत ठेवण्यात आला होता. यावर चर्चा होऊन सदर जागेचे आरक्षण लोकहितासाठी कायम ठेवावे व जमीनमालकाला नियमानुसार मोबदला द्यावा, असा ठराव पास करण्यात आला होता. आजच्या आमसभेत पुन्हा या विषयावर चर्चा करण्यात आली. या आरक्षित जागेचे स्थळ निरीक्षण करण्याचे सूचविण्यात आले. मात्र यावर नरगसेवक नंदू नागरकर यांनी आक्षेप घेतला. मागील आमसभेत नगररचना विभागाकडूनच हा विषय ठेवण्यात आला. या विषयावर चर्चा होऊन जागा मनपा दवाखान्यासाठी आरक्षित ठेवून मोबदला जमीन मालकास देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे या विषयाची आता चर्चा का, असा सवाल नागरकर यांनी उपस्थित केला. त्यानंतर पाणी पुरवठ्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. पाणी पट्टी कर पुन्हा उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडेच जमा करण्याविषयी सभागृहात सांगण्यात आले. यावर बहुतांश नगरसेवकांना आक्षेप घेतला. नगरसेवक रामू तिवारी, राजकुमार उके, नंदू नागरकर, वनश्री गेडाम, सुनिता लोढिया, गजानन गावंडे, प्रविण पडवेकर यांच्यासह अनेकांना यावर आपले मत प्रदर्शित केले. नगरसेवक राजकुमार उके यांनी तर या निर्णयाला प्रचंड विरोध केला. नागरिकांना पाणी मिळत नसतानाही कंत्राटदाराची पाठराखण का केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नगरसेविका वनश्री गेडाम यांनी तर पाणी पुरवठ्यासाठी नवीन निविदा काढण्याचे सूचविले. नगरसेवक गजानन गावंडे यांनी पाणी पुरवठ्यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही आणि महापौरांचा प्रशासनावर वचक नाही, असा आरोप केला. नगरसेविका सुनिता लोढिया यांनी आपला तिव्र संताप व्यक्त केला. पाणी पुरवठ्याचा प्रश्न आमसभेत आठव्यांदा उपस्थित झाला आहे. नगरसेवक याबाबत सभागृहात जाब विचारत असतानाही महापौरांनी कधीच उत्तर दिले नाही. त्यांनी समाधानकारक उत्तर द्यावे, असेही त्या म्हणाल्या. एकूण या विषयावर काही वेळ चांगलाच गदारोळ झाला. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, बुट, मोजे खरेदीचा विषय चर्चेसाठी आला. मात्र हा विषय आता शैक्षणिक सत्र संपत असताना का आला, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर काही वेळ चर्चा झाल्यानंतर हा विषय पारित करण्यात आला. यावेळची आमसभा अर्धा तासही चालू शकली नाही, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)
पाणी पुरवठ्यावरून पुन्हा वादळ
By admin | Updated: January 17, 2016 00:48 IST