मनपाची आमसभा : कोळसा व्याप्त जमिनीच्या मुद्यावरही चर्चालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनपाच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीनंतरची पहिली आमसभा आज सोमवारी मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. या सभेत पुन्हा चंद्रपूरच्या पाणी पुरवठ्यावरून सभागृहात रोष व्यक्त करण्यात आला. वारंवार तक्रारी करूनही संबंधित कंत्राटदाराला अभय का देण्यात येत आहे, असा जाब काही नगरसेवकांनी विचारला. यावरून काही वेळ सभागृहात वादळ निर्माण झाले.सोमवारी दुपारी १ वाजता महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली या आमसभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे व्यासपीठावर उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच महापौर अंजली घोटेकर यांनी वसंत देशमुख यांना सभागृह नेता, डॉ. सुरेश महाकूळकर यांना काँग्रेसचे गटनेता, अनिल रामटेके यांना बसपाचे गटनेता व पप्पु देशमुख यांना शहर विकास आघाडीचे गटनेता म्हणून घोषित केले. त्यानंतर मागील आमसभेचा वृत्तांत व स्थायी समितीच्या प्रस्तावाबाबत माहिती देण्यात आली. महसूल विभागाच्या अखत्यारित असलेली काही जमीन सध्या कोळसा व्याप्त क्षेत्रात दाखविण्यात आली आहे. ही जमीन महसूल क्षेत्रात करण्यासंबंधीचा प्रस्ताव मनपाने तयार करावा व त्यास मंजुरी द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. यावर नगरसेवक नंदू नागरकर, डॉ. सुरेश महाकूळकर यांनी आक्षेप घेतला. सदर जमीन कुणाला देणार आहे, त्या संस्थांची नावे आधी सांगा, त्यानंतरच प्रस्तावाला मंजुरी द्या, अशी मागणी नागरकर यांनी दिली. त्यानंतर या विषयावर अधिक चर्चा होऊ शकली नाही. दरम्यान, स्वीकृत सदस्यांचे नामांकन अर्जांची आयुक्त संजय काकडे यांनी छाननी करून सर्व अर्ज पात्र ठरविण्यात आले. त्यानंतर महापौर अंजली घोटेकर यांनी स्वीकृत सदस्यांची नावे घोषित केली. यासोबतच महिला व बालकल्याण समितीच्या १२ सदस्यांचीही निवड या आमसभेत करण्यात आली. अजेंड्यावरील विषय संपल्यानंतर नगरसेवक प्रशांत दानव यांनी पाणी पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सभागृहातील वातावरणच बदलले. मागील अनेक महिन्यांपासून चंद्रपूरकर पाण्यासाठी बोंबा मारत आहेत. मात्र मनपाकडून काहीही कार्यवाही केलेली जात नाही, यावर प्रशांत दानव यांनी रोष व्यक्त केला. नगरसेवक प्रदीप डे, पप्पु देशमुख, दीपक जयस्वाल, धनराज सावरकर यांनीही कोलमडलेल्या पाणी वितरण व्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला. पाणी पुरवठा कंत्राटदार वीज बिल अधिक येऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक अर्धी टाकी भरतो. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. अधिकाऱ्यांसोबत त्याचे साटेलोटे आहे, असा आरोप नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी केला. यावर महापौर अंजली घोटेकर यांनी नगरसेवकांचे समाधान केले. पाणी प्रश्नाबाबत आपणही अवगत आहोत, नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहे. टिल्लूपंप जप्तीची कारवाई करीत आहोत. अमृत योजना दीड वर्षात पूर्णत्वास आली पाहिजे, व पाणी मिळाले पाहिजे, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे महापौरांनी सांगितले.स्वीकृत सदस्यांची घोषणाआजच्या आमसभेत महानगरपालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांची महापौर घोटेकर यांनी अधिकृत घोषणा केली. स्वीकृत सदस्यांमध्ये भाजपाचे राजीव गोलीवार, रामपालसिंग व राजेश मून, काँग्रेसचे संजय महाडोळे व बसपाचे कुशल पुगलिया यांचा समावेश आहे. या सर्वांचे महापौर अंजली घोटेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महिला व बालकल्याण समितीआमसभेत महिला व बालकल्याण समितीच्या १२ सदस्यांची निवड करण्यात आली. यात भाजापाच्या अनुराधा हजारे, जयश्री जुमडे, वनिता डुकरे, चंद्रकला सोयाम, कल्पना बुगुलकर, सीमा रामेडवार, सविता कांबळे, कॉग्रेसच्या विना खनके, सकिना अन्सारी, बसपाच्या पुष्पा मून, राजलक्ष्मी कारंगल आणि शहर विकास आघाडीच्या मंगला आखरे यांचा समावेश आहे.नगरसेवकांसाठी बॅचमनपा नगरसेवक, नगरसेविका यांची अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळख व्हावी, यासाठी सर्वांना एक बॅच देण्यात यावा, असा प्रस्ताव महापौर अंजली घोटेकर यांनी सभागृहात ठेवला. याला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. आणि हा बॅच सर्वांनी आवर्जुन लावावा, अशी विनंतीही महापौरांनी यावेळी सभागृहात केली.
पाणी पुरवठ्यावरून पुन्हा वादळ
By admin | Updated: May 30, 2017 00:31 IST