जीएमआर एनर्जी कंपनीचा प्रताप : कुटुंबावर उपसामारीचे संकटवरोरा : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत वर्धा पॉवर कंपनीतील जी एम आर एनर्जी लिमीटेड ही कंपनी कोळशापासून वीज निर्मिती करून वीज विक्री करते. या कंपनीत शेकडो रोजंदारी मजूर काम करतात. मात्र मजुरांनी संघटना स्थापन करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतल्याने कोणत्याही सुचनाविना कामगारांना काढून टाकल्याचा प्रकार एम को एनर्जी लिमीटेड या कंपनीकडून घडला आहे. कंपनी करोडो रुपये नफा कमविण्यात व्यस्थ असून या कंपनी मध्ये लागणारे कामगार हे अनेक कंत्राटदाराच्या माध्यमातून रोजंदारीवर काम करीत आहे. कामगारांना त्यांचे मूळ हक्क मिळावे यासाठी जी एम आर पॉवर कामगार संघटना स्थापन झाली. मात्र कामगार संघटना तयार करण्याच्या प्रक्रियेत कार्यरत कामगार सहभागी झाल्याने कंपनी व्यवस्थापनाने कामगार विरोधी आकसाची भूमिका घेऊन कामगारांना कंपनीतून काढून टाकले. त्यामुळे कामगारांच्या परिवारावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. कामगारांना पुर्ववत कामावर घेण्यासंदर्भात कामगार संघटनांनी अध्यक्ष दिनेश चोखारे व महासचिव सुरेंद्र बन्सोड यांच्या नेतृत्वात व्यवस्थापन व कामगार सहआयुक्तांना निवेदन सादर केले. परंतु आजतागायत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने कामगारांत असंतोष पसरला आहे. जी एम आर एनर्जी लिमिटेड ही कंपनी कोळशापासून विद्युत तयार करीत आहे. कंपनीला लागणारे कुशल, अर्धकुशल तसेच अकुशल मनुष्यबळ हा अनेक ठेकेदारांच्या माध्यमातून पुरवला जातो. हे बेकायदेशीर असल्याचे मत कामगार संघटनेच्या कामगारांनी ‘लोकमत’ व्यक्त केले .कामगार संघटनेत सभासद झालेल्या कामगारांना आपल्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून नोकरीवरून कमी करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे कामगार विरोधी तसेच संघटना संपविण्याचे धोरण आहे, असे नमूद करून कामगार संघटनांनी महाव्यवस्थापक (कार्मिक व प्रबंधक) यांना निवेदन दिले. मात्र कुठलाही तोडगा निघालेला नाही . (शहर प्रतिनिधी )
संघटनेत सहभागी होणाऱ्या कामगारांना काढले
By admin | Updated: March 16, 2017 00:40 IST