माजरी : भद्रावती तालुक्यातील सर्वात मोठी व श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजरी ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायतीच्या सभागृहात लहान मुलीच्या हाताने ईश्वरचिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण १७ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. माजरी ग्रामपंचायती अंतर्गत सहा प्रभागांतर्गत एकूण १६ हजार ८४७ मतदार आहेत.या विशेष सभेला भद्रावतीचे नायब तहसीलदार व्ही.व्ही. किन्हीकर, महसूल विभागाचे नंदोरी सर्कलचे मंडळ अधिकारी एम.एम. काळे, तलाठी ए.आर. दडमल, परचाके, सहाय्यक (कोतवाल), ए.एन. मेश्राम, विनोद वानखेडे आदी उपस्थित होते.माजरी येथील वार्ड प्रभाग एकसाठी सर्वसाधारण एक व ओबीसी महिला एक अशा दोन जागा आरक्षित करण्यात आल्या. प्रभाग दोनसाठी सर्वसाधारण एक, अनुसूचित जाती महिला एक व ओबीसी महिला एक, प्रभाग तीन नागरिकांचा मागासवर्ग ओबीसी एक, अनुसूचित जाती महिला एक, सर्वसाधारण महिला एक, प्रभाग चारसाठी ओबीसी एक, एससी महिला एक व अनुसूचित जमाती महिला एक, प्रभाग पाच अनुसूचित जाती एक, सर्वसाधारण एक व ओबीसी महिला एक तसेच सर्वसाधारण महिलेसाठी एक अशी सोडत निघाली आहे.एकूण १७ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. यामुळे इच्छुक पुरुष उमेदवारांमोठी अडचण निर्माण झाली असून राजकीय मंडळी कामाला लागली आहे. येत्या आॅगस्ट महिन्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे आणि आरक्षण सोडत निघाल्याने हवसे,नवसे गवसेही बाशिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार झाले आहे. प्रस्तुत सोडतीसंदर्भात अहवाल भद्रावती तहसिलदारांना व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरला सादर करण्यात येणार असल्याची माहिती माजरी ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आली. (वार्ताहर)
माजरी ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर
By admin | Updated: February 1, 2015 22:53 IST