चंद्रपूर : खासगी प्रवासी वाहनांमुळे राज्य परिवहन महामंडळाची एसटी तोट्यात आहे, असे नेहमीच म्हटले जाते. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अनेक बसगाड्या उशिरा धावत आहेत. परिणामी एसटी महामंडळ तोट्यात चालत आहे. चंद्रपूर येथून सुटणाऱ्या अनेक बसफेऱ्या तास-दोन तास नव्हे तर तब्बल चार-चार तास उशिराने सुटत असल्याने प्रवाशांना ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढावे, या दृष्टीने महामंडळाने अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी साप्ताहिक, मासिक, तिमाही तसेच वार्षिक पास सुविधाही राज्य परिवहन महामंडळाने सुरू केली आहे. याशिवाय गाव तेथे एसटी हे धोरण अवलंबून प्रत्येक खेडोपाडी एसटी पोहोचविली. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आरक्षणाची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, चंद्रपूरसारख्या एसटीचे विभागीय कार्यालय असलेल्या ठिकाणीच या आरक्षण केंद्राची अवस्था दयनीय आहे. येथे नियुक्त कर्मचारी अनेकदा जागेवर राहत नाही. तर उपस्थित कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने बऱ्याचदा या केंद्राचा कोणताच लाभ प्रवाशांना होत नाही. सध्या दिवाळी सणानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची बसस्थानकावर मोठी गर्दी आहे. मात्र, आगारातून सुटणाऱ्या अनेक बसफेऱ्या नियोजित वेळी न सुटता उशिराने सुटत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेने ेएसटी महामंडळ तोट्यात
By admin | Updated: October 28, 2014 22:55 IST