संपूर्ण राज्यामध्ये कोविड -१९ चा प्रादुर्भाव असल्यामूळे लॉकडाऊन व संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्याचे हित लक्षात घेऊन यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणेच्या वतीने होणारी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेला राज्यभरातील तब्बल १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे. राज्य मंडळाकडून परीक्षेसाठी प्रत्येक नियमित विद्यार्थ्यांकडून ४१५ व पुनर्परीक्षार्थ्यांकडून ३९५ रुपये शुल्क आकारले जाते. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोजगार गेलेले आहेत. त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्राचा खर्च, पर्यवेक्षकांना मानधन, भरारी पथकाचा खर्च व दळणवळणाचा खर्च आणि इतर खर्च होणार नसल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:30 IST