चंद्रपूर : भिसी व परिसरातील पऱ्हाटीवर लाल्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे झाड सुकत असून पऱ्हाटीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला असून लाल्या रोगाचा ओलित असलेल्या कापसाला फटका बसताना दिसत आहे.भिसी, कपर्ला, येरखडा, डोंगला, सावली, खापरी, कन्हाळगाव, पिंपळनेरी, उमरी या परिसरातील शेतकऱ्यांच्या पऱ्हाटीला लाल्या रोगाने ग्रासले आहे. कमी पावसाचा परिणाम पऱ्हाटीवर झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक जात असल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.या ना त्या कारणावरून शेतकऱ्यांची फरकट सुरू असताना आता उभे पीक हातातून जात असल्यामुळे जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचे साधन नसल्याने लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाने दगा दिला आणि आता कापूसही हातातून जाणार या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.दोन वर्षापुर्वी सोयाबीन पिकाची पेरणी या भागात मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु पिकाच्या उत्पादनातून सतत घट होत असल्याने शेतकऱ्यांनी पऱ्हाटीची लागवड केली. यावर्षी कमी पावसाने पऱ्हाटीलाही झटका बसला ज्यांनी सोयाबीन पेरले त्यांना एकरी अर्धा पोता सोयाबीन उत्पन्न झाले. त्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. शेत पिकांची नासाडी झाल्याने शासनाने चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
लाल्या रोगाने पऱ्हाटीचे पीक घटणार
By admin | Updated: November 30, 2014 23:02 IST