चंद्रपूर : केंद्र शासनाने तांदुळ निर्यातीवर बंदी घालताच त्याचा परिणाम राईस मिल उद्योगावर पडला आहे. यामुळे राईस मिल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून धानाची खरेदी-विक्री मंदावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुुळे तांदुळ उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. याला जबाबदार केंद्र शासनाने केलेल्या बासमती तांदळावरील निर्यात बंदी आहे, बंदी होताच बाजार समिती मधील धान विक्री मंदावली व त्याच बरोबर धानाचे भाव ५०० ते ७०० रुपयाने घसरले आहेत.जिल्ह्यात सिंदेवाही, मूल, सावली, नागभीड, ब्रह्मपुरी हे तालुके धान उत्पानात अग्रेसर आहेत. या तालुक्यात राईस मिलची संख्याही मोठी आहे. परंतु तांदूळ निर्यातीच्या बंदीमुळे राईस मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. धानाची विक्री कमी झाली, आणि दरही घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांनी धान खरेदी बंद केल्यामुळे बाजारात धानाची विक्री कमी होवू लागली आहे. आणि म्हणूनच धानाचे भाव घसरले. मागील वर्षी श्रीराम धानाला २२०० ते २४०० रूपये क्विंटल भाव मिळाला होता. परंतु यावर्षी १८०० रूपये दर मिळणेही कठीण झाले आहे. म्हणजे शासन निर्णय शेकतऱ्यांसाठी घातक ठरत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना झाली नाही तर, शेतकरी तर आत्महत्या करतीलच पण राईस मिल मालकावरही ही वेळ येऊ शकते. (स्थानिक प्रतिनिधी)
धानाची आवक घटली
By admin | Updated: March 11, 2015 01:00 IST