पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : शेतकरी आंदोलन तीव्र करणारवरोरा : सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी वरोरा तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची दखल घेत कालव्यातून क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडल्याने वाढोडा गावानजीक कालव्याला पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे भगदाड पडून लाखो लिटर पाणी व्यर्थ गेले. आता पाणी थांबविले असून भगदाडाची दुरुस्ती होईपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे आता शेतकरी आपले आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.वरोरा तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याकरिता वर्धा जिल्ह्यातील लाल व पोथरा कॅनलमधून पाणी सोडले जाते. सध्याच्या हंगामात दुबार पिकाकरिता शेतकऱ्यांनी आपल्या शेत्या तयार केल्या. परंतु पाटबंधारे विभागाने जाहीर प्रकटन केले नाही. समित्यांच्या बैठका घेतल्या नाही. त्यामुळे पाणी कालव्यात केव्हा येईल याची माहिती नाही. परिणामी २७ गावातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या वरोरा कार्यालयात मागील दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत एक दिवसापूर्वीपासून कालव्यात पाणी सोडणे सुरू केले. कालव्यात सर्वप्रथम ४ क्युबिक मीटर पाणी सोडावे लागते. परंतु आंदोलन त्वरित संपले पाहिजे व शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचले पाहिजे, याकरिता एकाच वेळी दोन्ही कालव्यातून प्रत्येकी ४ क्युबिक मीटर पाणी सोडण्यात आले. वाढोडा गावानजीकच्या कालव्यात ८ क्युबिक मीटर पाणी एकाच वेळेस आल्याने कालव्याला मोठे भगदाड पडले. पाटबंधारे विभागााला याची माहिती मिळेपर्यंत लाखो लिटर पाणी व्यर्थ गेले. त्यानंतर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. आता कालव्याच्या या भगदाडाची दुरुस्ती होतपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, पाटबंधारे विभागाचा कामचुकारपणा परत एकदा समोर आला आहे.वरोरा येथील पाटबंधारे अभियंत्याचे स्थानांतरण वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाही व शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने वरोरा येथे कार्यरत पाटबंधारे विभागाच्या एका अभियंत्याचे तातडीने स्थानांतर केले असल्याचे समजते. त्या जागी कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग नागपूर येथून अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
लाल पोथरा कालव्याला भगदाड
By admin | Updated: November 2, 2014 22:31 IST