चंद्रपूर : धान उत्पादन जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असली तरी अन्य पिकांचीही पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र बहुतांश तलाठी शेतात न जाताच सातबारा उताऱ्यावर घरबसल्याच पेरव्याची नोंद करीत असल्याने शेतात एक आणि सातबारावर दुसऱ्याच पिकाची नोंद होत असल्याची प्रकार समोर आला आहे. यातून प्रशासन केवळ कागद रंगविण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नुकसानभरपाई मिळवण्यात अनेकांना अडचण होत आहे. असाच प्रकार भद्रावती तालुक्यात उघड झाला आहे.
पाऊस कोसळला की, दरवर्षी शेतकरी शेतात पेरणी करतात. जिल्ह्यात किती हेक्टरवर कोणत्या पिकांची लागवड झाली याची माहिती कळावी यासोबतच पीकविमा भरताना अडचणीचे जाऊ नये आणि नुकसानभरपाई मिळविणे सहजशक्य व्हावे यासाठी नमुना १२ मध्ये तलाठ्यांकडून शेतात घेतलेल्या पिकांची नोंदणी केली जाते. यासाठी तलाठ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन नोंद घ्यावी लागले. मात्र जिल्ह्यातील काही तलाठी घरबसल्याच तसेच काही वेळा शेतकऱ्यांना विचारून नमुना १२ मध्ये पिकांची नोंद करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शासनदरबारी खोटा अहवाल जात आहे, हा प्रकार जिल्ह्यातील बहुतांश गावांत सुरू आहे.
भद्रावती तालुक्यातील एका गावातील शेतकरी शेतात पेरणीही करीत नाही, असे असतानाही मागील ३० ते ३५ वर्षांपासून कधी कापूस तर कधी सोयाबीनचा पेरवा दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या शेतात पेरवा दाखविण्यात आला आहे. त्या शेतामध्ये मोठमोठे वृक्ष असून सर्वत्र झाडेझुडपे आहेत.
बाॅक्स
चौकशी करा, सत्य बाहेर येईल!
जिल्ह्यात धान, सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिके घेतली जातात. मात्र अनेकांच्या सातबाऱ्यामध्ये वेगळाच पेरा दाखविला जात आहे. बहुतांश तलाठी घरबसल्या अंदाज घेऊन सातबारा उताऱ्यावर पेरा दाखवित असल्यामुळे शेतकरी पीकविमा तसेच इतर सुविधांपासून वंचित राहत आहे.
बाॅक्स
पीकविम्यापासून वंचित
तलाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर वाट्टेल तसा पेरवा दाखवित असल्यामुळे एखाद्या वर्षी नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्या तुलनेत पीकविमाचे पैसेच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जेवढ्या जागेवर ज्याची पेरणी केली आहे, तेवढीच दाखविल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.
बाक्स
काय असते सातबारा उताऱ्यामध्ये
नमुना सातमध्ये भोगवटादार जमीन कसणाऱ्याचे नाव असते, तर नमुना बारामध्ये कोणते पीक घेतले आहे याबाबतची नोंद असते. नमुना आठमध्ये खाते क्रमांक असतो. यात एखाद्याची त्या गावामध्ये असलेल्या जमिनीची मालकी नोंद असते.
बाॅक्स
भद्रावती तालुक्यात असाही प्रकार
भद्रावती तालुक्यातील एका गावामध्ये शेतकऱ्याच्या नावाने जमीन आहे. या जमिनीवर मागील ४० वर्षांपासून मोठमोठे वृक्ष, झाडे-झुडपे वाढली आहेत. मात्र या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यामध्ये दरवर्षी सोयाबीन, कापूस अशी नोंद होत असल्याचा प्रकास उघडकीस आला आहे.
बाॅक्स
शासनाची फसवणूक
शेतामध्ये शेतकऱ्यांनी काय पेरले याची माहिती सातबाऱ्यामध्ये दाखविली जाते. यानुसारच किती हेक्टरमध्ये किती पेरणी केली याचा अनुमान संबंधित विभाग बांधताे व तसा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जातो. मात्र तलाठी आपल्या अंदाजानुसार सातबारामध्ये पेरवा नोंद करत असल्यामुळे नेमकी किती हेक्टरमध्ये पेरणी झाली. याचा अहवाल चुकीचा होत आहे.
बाॅक्स
शेतकऱ्यांचे मौन
प्रत्येक शेतकऱ्याचे तलाठ्याकडे काम असते. त्यामुळे आपले काम बिघडू नये यासाठी शेतकरी काहीच बोलत नाही. तलाठी जे विचारणार ते मुकाट्याने सांगतात.