बाबुराव परसावार - सिंदेवाहीडॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४२ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची २0१४ (जॉईट अँग्रेस्को) बैठक पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांमध्ये करण्यात आलेल्या विविध विषयातील २६३ संशोधनपैकी २0२ संशोधन शिफारसी दीर्घ चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या.महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांमध्ये दरवर्षी नियोजनाप्रमाणे विविध संशोधने विविध विभागाअंतर्गत सुरू असतात. यामध्ये समन्वय राहण्यासाठी दरवर्षी चारही विद्यापीठातील संशोधक, संचालक, विभाग प्रमुख यांच्यासह महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथील संचालक यांची संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची ४२ वी बैठक दापोली येथे पार पडली. या बैठकीमध्ये २0१३-१४ या वर्षामध्ये विकसित झालेल्या तंत्रज्ञान, संशोधन आणि विविध पिकांच्या जातीचे सादरीकरण १0 विभागामध्ये करण्यात आले. प्रत्येक संशोधनावर कृषी विद्यापीठ अकोला, परभणी, दापोली, राहुरी या चारही विद्यापीठातील त्या विषयातील शास्त्रज्ञ व तज्ज्ञ यांच्यामध्ये सखोल चर्चा होवून प्रसारणाकरीता शिफारसी करण्यात आल्या. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाअंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथील चार शिफारसीना संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीने मान्यता दिली आहे. कृषी विद्यापीठ विभागातर्फे करण्यात आलेल्या शिफारसीमध्ये पूर्व विदर्भ विभागासाठी भात रोवणीस पर्याय म्हणून पेरीव धानाची लागवड २0 से.मी. अंतरावर हेक्टरी १00 किलो बियाणे वापरून तसेच तण नियंत्रणासाठी पेंडी मिथॅलीन १.0 किलो प्रती हेक्टर क्रियाशील घटकाची फवारणी पेरणीनंतर लगेचच तसेच ३0 दिवसांनी निंदण करण्याच्या शिफारसीला मान्यता मिळाली. तसेच पूर्व विदर्भ विभागासाठी लवकर येणार्या व मध्यम कालावधीचा धान कापणीनंतर १५ ते ३0 नोव्हेंबर दरम्यान हरभरा पिकाची पेरणी करण्याच्या शिफारसीला मान्यता मिळाली आहे. किटकशास्त्र विभागातर्फे धान पिकात तपकीरी तुडतुड्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच वाढीव नफा खर्चाच्या गुणोत्तराकरिता इमिडॅक्लोप्रीड, १७.८ एस.एल. २.२ मिली किंवा फ्रिप्रोनिल, ५ एस.सी. २0 मिली किंवा थायोमिथोक्झाम, २५ डब्लु.जी. २ ग्रॅम प्रती १0 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याच्या शिफारसीला मान्यता देण्यात आली. या संशोधन केंद्राद्वारे धान पिकाचे सिंदेवाही ६३-२८ या मध्यम बारीक वाणास पूर्व विदर्भ विभागासाठी पूर्व प्रसारित करण्यात आली आहे. हे वाण १३५-१४0 दिवसांचे असून करपा, कडाकरपा व खोडकिडीला मध्यम प्रतीकारक आहे. तांदळाची प्रत मध्यम बारीक असून खाण्यास चवदार आहे. त्यालाही मान्यता मिळाली.
सिंदेवाही कृषी संशोधन केंद्रातील तंत्रज्ञानाला राज्यस्तरावर मान्यता
By admin | Updated: May 29, 2014 23:56 IST