चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वादग्रस्त गावांमध्ये महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्यातून वीज पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. मात्र, तेथील नागरिकांनी तेलंगणा राज्याकडून वीज घेतली असल्याने महाराष्ट्राचे केवळ खांबच उभे आहेत. मात्र नागरिकांनी तेलंगणा राज्याच्या वीज यंत्रणेपासून अलिप्त होऊन महावितरणकडे अर्ज केल्यास तत्काळ वीज कनेक्शन देणार असल्याची माहिती वीज वितरण विभागाने दिली आहे. सीमेवरील गावांमध्ये दोन्ही राज्यांद्वारे विजेच्या प्राथमिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र तेथील ग्रामस्थ हे वीज तेलंगणामधून वापरत आहेत. महाराष्ट्र वीज कंपनीद्वारा वादग्रस्त गावांत राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत उच्चदाब वीजेचे खांब व लघु दाब विजेचे खांब, वीज वाहिण्यांचे जाळे तसेच रोहित्रे उभारणीचे काम करण्यात आले आहे. परंतु, या यंत्रणेचा उपयोग ग्रामस्थांनी वीज जोडणी घेतल्यावरच होणार आहे. आठ गावामध्ये तेलंगणा राज्यातून सिंगल फेज वीज पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज वितरणने उभारलेल्या वीज यंत्रणेतून गावकऱ्यांनी वीज घेण्यासाठी अर्ज करावा, अशा सुचना वारंवार देण्यात आल्या आहेत. परंतु कोणीही अर्ज केलेला नसून डिमांडही भरलेली नाही. तसेच महावितरणचा वीज पुरवठा घेण्यापूर्वी ग्रामस्थांनी तेलंगणाच्या वीज यंत्रणेपासून पूर्णपणे वेगळे होणे आवश्यक आहे, असे वीज वितरणने म्हटले आहे. तेलंगणानाच्या वीज यंत्रणेत महावितरणचा वीज पुरवठा सोडण्यात आला तर ते अवैध आणि अतिशय धोकादायक ठरणार आहे. अशावेळी ग्रामस्थांनी एकाच यंत्रणेतून वीज सुरू ठेवणे आवश्यक आहे. गावात महाराष्ट्राची वीज यंत्रणा उभी असल्याने ग्रामस्थांनी अर्ज केल्यास त्यांना तातडीने वीज उपलब्ध देणार असल्याचे महावितरणचे हरीष गजबे यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वादग्रस्त गावांत वीज यंत्रणा सज्ज
By admin | Updated: February 12, 2015 00:50 IST