वन सचिवांकडून आढावा : बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत होणार करार चंद्रपूर : प्रख्यात उद्योगपती रतन टाटा ५ जानेवारीला चंद्रपूर येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्ट आणि वनविभागाच्या चिचपल्ली येथे होवू घातलेल्या बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत सामंजस्य करार होणार आहे. चांदा क्लब मैदानावर हा भव्य सोहळा होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु आहे. वन सचिव विकास खारगे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत आढावा घेतला. मैदानास भेट देवून तयारीची प्रत्यक्ष पाहणीही त्यांनी यावेळी केली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सदर सामंजस्य करार व भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन आढावा बैठकीला खारगे यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मुख्य वनसरंक्षक तथा ताडोबा प्रकल्पाचे संचालक जी.पी.गरड, वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक एस.एस.डोळे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. चांदा मैदानावर हा सोहळा होणार असून सोहळा नियोजनाचा आढावा खारगे यांनी बैठकीत घेतला. कार्यक्रम उत्कृष्ठरित्या पार पाडण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समित्यांचे प्रमुख बनविण्यात आले आहे. मैदानावर कार्यक्रमाची तयारी सुरु करण्यात आली असून त्याची पाहणीही खारगे यांनी केली. कार्यक्रमाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त, वाहतुक व्यवस्था, बैठक व्यवस्था, स्वच्छता, उपस्थितीत नागरिकांना अल्पोहार आदींचे नियोजनही बैठकीत करण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती बैठकीत सादर केली. (स्थानिक प्रतिनिधी) पट्टे वाटप व ई-लर्निंग सुविधेचे होणार उद्घाटन ५ जानेवारी रोजी टाटा ट्रस्टसोबत चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत करार होणार आहे. सदर प्रशिक्षण केंद्र अत्याधुनिक व देशातील सर्वात चांगले केंद्र बनविण्यासाठी टाटा ट्रस्ट सहकार्य करणार आहे. असून श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना, ताडोबा अगरबत्ती प्रकल्पाचा शुभारंभ, सामूहिक वनहक्क दावेबाबत मार्गदर्शन व पट्टे वाटप तसेच जिल्हा परिषदेच्या ५७१ शाळांमध्ये ई-लर्निग सुविधेचे उद्घाटन होणार आहे.
रतन टाटा यांच्या स्वागतासाठी चांदा क्लब मैदानावर जय्यत तयारी
By admin | Updated: December 31, 2016 02:06 IST