श्री गुरुदेव अधिष्ठानाचे पूजन शेषानंद पांडे महाराज यांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी ‘राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धा’ तसेच गरीब व गरजूंना घरपोच ब्लँकेटचे वाटप करण्यात येऊन दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचा परिसंवाद घेण्यात आला व यामध्ये १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ग्रामगीतेतील अध्याय ‘जीवनकला व ग्राम आरोग्य’ यावर आपले चिंतन प्रकट केले. पौर्णिमाताई सवाई यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलन झाले. साक्षी अतकरे बाल कीर्तनकार यांच्या कीर्तनाने संमेलनाची सुरुवात होऊन कार्यक्रमप्रसंगी निर्मलाताई खडतकर, प्रेमिलाताई पिंपळकर, कविता येणूरकर, ऊर्मिला बोंडे, मोनाली बतकी यांनी मार्गदर्शन केले. संचालन सुवर्णा पिंपळकर व आभार उषाताई आखाडे यांनी मानले.
कार्यक्रमप्रसंगी झालेल्या राष्ट्रसंत व्याख्यानमालेत आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांची समाजाला गरज असून ते जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. तसेच निंबाजी महाराज तागड व संच नागपूर यांनी भारुडाचा कार्यक्रम व मानव सेवा छात्रालय, गुरुकुंज आश्रम यांनी ‘स्वर गुरुकुंजाचे’ हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमप्रसंगी सुरक्षा नगर परिसरात रामधून काढण्यात येऊन यानिमित्ताने परिसरात साफसफाई करून मार्गावर राष्ट्रसंतांच्या प्रतिमा व रांगोळ्याने मार्ग सुशोभित करण्यात आले. याप्रसंगी मनोज महाराज चौबे यांनी रामधूनच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. तसेच सामुदायिक ध्यान व प्रार्थनेच्या महत्त्वावर अरविंद राठोड, नामदेव गव्हाळे महाराज यांनी चिंतन प्रकट केले. सुनील महाराज लांजुळकर यांनी गोपालकाल्याचे किर्तन सादर केले. याप्रसंगी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, सेवकरामजी मिलमिले, चंद्रकांत गुंडावार, केशवानंद मेश्राम महाराज यांनी मार्गदर्शन केले.