शेतकरी चिंतेत : डोळ्यादेखत पिकाची नासाडी आक्सापूर : गोंडपिंपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षीच अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करावा लागतो. तालुक्यात सिंचनाची कुठलीच सुविधा नाही. निसर्गावर अवलंबून शेतकरी शेती करतात. सतत दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात डोळ्यादेखत रानडुकराचे कळप धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे हाती आलेले पीक नष्ट होत असल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. यात तो पुरता खचून जावून आर्थिक संकटात सापडला आहे.गोंडपिंपरी तालुक्यातील आक्सापूर परिसरातील करंजी, धानापूर, बोरगाव, चेलबेरडी, गणपूर, चेकपेलूर शेतशिवारात धानपिक हे शेवटच्या टप्प्यात आहे. शेतकरी रात्रीच्या वेळी जिवाची पर्वा न करता मारोशी टाकून रात्रभर जागल करतात. परंतु त्याच वेळेस रानडुकराचे कळप येवून त्यांच्या डोळ्यादेखत संपूर्ण धानपिक उपडून टाकून नासाडी करीत आहेत. परंतु मोठ्या कष्टाने पिकवलेले धानपीक नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहेत. होणारे नुकसान मुकाटपणे सहन केल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी वनविभागावर असते. मात्र दरवर्षीच शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या रानडुकराच्या बंदोबस्ताकडे प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही. याउलट शेतकऱ्यांनी बंदोबस्ताची उपाययोजना केल्यास कायद्याच्या कचाट्यात शेतकरी फसला जातो. असाच एक प्रकार नुकताच परिसरातील धानापूर येथे घडला. रानडुकराच्या बंदोबस्ताकरिता प्रशासनाकडून कोणतीही उपायोजना केली जात नसल्यामुळे शेतकऱ्याकडून रोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
रानडुकराच्या धुमाकुळाने धानपीक संकटात
By admin | Updated: November 7, 2016 01:27 IST