प्रशासनाचे आवाहन : स्वेच्छेने अवयवदान करावे चंद्रपूर : वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभाग व विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३० आॅगष्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत राज्यभर महाअवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी चंद्रपूर येथे जनजागृती रॅलीने करण्यात आला. या अभियानात नागरिकांनी स्वेच्छेने सहभागी होवून अवयवदान करावे व गरजू रुग्णांना मदत करावी, असे आवाहन महापौर राखी कंचलार्वार यांनी यावेळी केले.मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे महाअवयवदान अभियान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक पी. एम. मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, मनपाच्या नोडल अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. अंनत हजारे व अधिकारी उपस्थितीत होते.(स्थानिक प्रतिनिधी)विकारांनी त्रस्त रुग्णांना अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग-मोरेचंद्रपूर : अवयवदान साधारण दान नसून अवयवदान करणे म्हणजे सर्वश्रेष्ठ दान करणे आहे. अवयवदानांतर्गत किडनी, लिव्हर, लंग्ज, हार्ट, डोळे, त्वचा, यकृत, हृदय इत्यादी विकारांनी त्रस्त रुग्णांना असा कोणताही दुसरा मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी नवीन अवयव प्रत्यारोपण करणे हा एकमेव मार्ग असल्याचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी कार्यक्रमात सांगितले.महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तर त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत या रॅलीचा समारोपही करण्यात आला. ही रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जटपूरागेट कस्तुरबा मार्गे गांधी चौक अशी काढयात आली होती. गांधी चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, नर्सेस व एनसीसीचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विविध पोस्टर्स व बॅनर्स विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. त्यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, जनता महाविद्यालय व स्व.सुशिलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कलापथकाव्दारे सादरीकरण करुन अवयवदान जनजागृती बाबतचे महत्व पटवून दिले. (स्थानिक प्रतिनिधी)
रॅलीने महाअवयवदान अभियानाचा शुभारंभ
By admin | Updated: August 31, 2016 00:42 IST